अजनी परिसरात वृक्ष, फुलपाखरू, पक्ष्यांची श्रीमंती नष्ट होणार ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:12 IST2020-12-02T04:12:13+5:302020-12-02T04:12:13+5:30

नागपूर : अजनी परिसर जैवविविधतेने समृद्ध आहे. मोठ्या प्रमाणात नाना प्रजातीचे वनस्पती, फुलपाखरू, सरपटणारे प्राणी आणि पक्ष्यांचा अधिवास येथे ...

Tree, butterfly, bird wealth will be destroyed in Ajni area () | अजनी परिसरात वृक्ष, फुलपाखरू, पक्ष्यांची श्रीमंती नष्ट होणार ()

अजनी परिसरात वृक्ष, फुलपाखरू, पक्ष्यांची श्रीमंती नष्ट होणार ()

नागपूर : अजनी परिसर जैवविविधतेने समृद्ध आहे. मोठ्या प्रमाणात नाना प्रजातीचे वनस्पती, फुलपाखरू, सरपटणारे प्राणी आणि पक्ष्यांचा अधिवास येथे आहे. कोणत्याही प्रकल्पासाठी येथील वृक्षतोड झाल्यास ही समृद्ध अशी जैवविविधता नष्ट होईल. अशा परिस्थितीत शासनातर्फे ''इंटर मॉडेल स्टेशन'' विकसित केले जात आहे. सिमेंटच्या जंगलात शुद्ध हवा देणारा हा भाग विकासाच्या नावाने नष्ट होऊ नये म्हणून इंटर मॉडेल स्टेशनच्या विरोधात पर्यावरण संघटना एकवटल्या आहेत.

अजनीसह, मेडिकल, भारतीय खाद्य निगमचा परिसर दक्षिण नागपूर भागात ग्रीन पॅकेट म्हणून अस्तित्व टिकवून आहेत. इतर भाग सिमेंटने व्यापला आहे. तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार अजनीच्या परिसरात २० ते २२ प्रजातीचे फुलपाखरू आहेत. १०० च्यावर प्रजातीचे पक्षी आणि जवळपास ३०० प्रजातीचे वनस्पती येथे आढळतात. त्यामुळे उरलेली ही हिरवाई टिकून राहावी म्हणून पर्यावरणवाद्यांनी संघर्षाचा इशारा दिला आहे.

- सिबा, बीएनएचएस करणार जैवविविधतेचा अभ्यास

सेंट्रल इंडिया बर्ड असोसिएशन (सिबा) आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) या संस्थांची टीम येथे येऊन लवकरच अभ्यास सुरू करणार आहे. या परिसरात लहान मोठे किती प्रजातीचे वृक्ष आहेत, फुलझाड किती आहेत, किती प्रजातीच्या पक्ष्यांचा, किड्यांच्या, सरपटणाऱ्या प्राण्यांचा अधिवास येथे आहे, याबाबत अभ्यास करून केंद्रीय पर्यावरण विभागाला अहवाल सादर केला जाणार असल्याचे श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले.

२०-२२ प्रजातीचे फुलपाखरू

नेचर्स लव्हर्स या संस्थेच्या टीमने नुकताच अजनी परिसरात फुलपाखरू आणि इनसेक्टसचा अभ्यास केला. या भागात २० ते २२ प्रजातीचे फुलपाखरू असल्याचे टीमचे छापेकर यांनी सांगितले. यासोबत अनेक प्रकारचे इनसेक्टस येथे आहेत. एका विशेष प्रजातीच्या मधमाशीचा अधिवास येथे आहे. या मधमाशीचे मध अतिशय पोषक असल्याचे मानले जाते.

वृक्षतोडीला रेल्वे युनियनचा विरोध

अजनी इंटर मॉडेल स्टेशनसाठी होणाऱ्या वृक्षतोडीला सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने विरोध केला आहे. पर्यावरण संस्थासोबत संघटना सुद्धा संघर्ष करेल, असा इशारा संघटनेचे देबाशीष भट्टाचार्य यांनी दिला.

अजनी इंटर मॉडेल स्टेशन प्रकल्पाला आमचा विरोध नाही. मात्र तो खापरी भागात विकसित केला जाऊ शकतो. नागपूर शहरात अतिशय थोड्या प्रमाणात हिरवळ शिल्लक आहे. आपण एका रात्रीत झाड लावू शकत नाही. विकासाच्या नावाने ती नष्ट करणे धोकादायक आहे. येणाऱ्या पिढीसाठी शुद्ध वातावरण ठेवावे लागेल. नाहीतर नागपूरचे प्रदूषण दिल्ली प्रमाणे वाढेल.

- श्रीकांत देशपांडे, पर्यावरण अभ्यासक

Web Title: Tree, butterfly, bird wealth will be destroyed in Ajni area ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.