बोगस डॉक्टरकडून कोरोना रुग्णांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:10 IST2021-04-30T04:10:21+5:302021-04-30T04:10:21+5:30

भिवापूर/बेसूर : कोरोना संक्रमणाच्या काळात पुरेशा आरोग्य सुविधेअभावी रुग्णांचा जीव टांगणीला आहे. याच संधीचा फायदा घेत तालुक्यात बोगस डॉक्टरांनी ...

Treatment of corona patients by bogus doctors | बोगस डॉक्टरकडून कोरोना रुग्णांवर उपचार

बोगस डॉक्टरकडून कोरोना रुग्णांवर उपचार

भिवापूर/बेसूर : कोरोना संक्रमणाच्या काळात पुरेशा आरोग्य सुविधेअभावी रुग्णांचा जीव टांगणीला आहे. याच संधीचा फायदा घेत तालुक्यात बोगस डॉक्टरांनी तोंड वर काढले आहे. डिग्री, अनुभव व अभ्यास नसताना असाच एक बोगस डॉक्टर कोरोना रुग्णांवर बेधडक उपचार करून त्यांच्या जीवाशी खेळत असल्याचा प्रकार तालुक्यातील बेसूर येथे सुरू आहे. याबाबत भाजपचे भास्कर येंगळे यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. हे डॉक्टर बाहेरराज्यातील असल्याचे समजते. गत काही वर्षांपासून नांद व बेसूर येथे त्यांनी दवाखाने थाटत रुग्णांवर उपचार करण्याचा गोरखधंदा सुरू केला. किरकोळ आजारावर प्राथमिक उपचार मिळत असल्याने रुग्णही बोगस डॉक्टरांच्या आश्रयाला जातात. यादरम्यान काही रुणांना आपला जीवही गमवावा लागला. याबाबत वर्षे दोन वर्षांपूर्वी परिसरातील इतर डॉक्टरांनी या बोगस डॉक्टरांच्या तक्रारी केल्या होत्या. आता कोरोना संसर्गजन्य परिस्थितीत बाधित रुग्णांना सरकारी व खासगी हॉस्पिटलमध्ये बेडअभावी प्रवेशच मिळत नाही. नांद, बेसूर व लगतच्या गावातील रुग्णांना भिवापूर व उमरेड येथील उपचार लांब पल्ल्याचा ठरतो. याच संधीचा फायदा घेत बेसूर येथे एका बोगस डॉक्टरने आपले पाय पसरले आहेत. १० ते १२ बेडचा दवाखाना टाकून तेथे कोरोना रुग्णावर उपचार केला जात असल्याची तक्रार भास्कर येंगळे यांनी केली आहे. सदर बोगस डॉक्टर कोरोना रुग्णांना अपेक्षित नसलेले इंजेक्शन व सलाईन लावून त्यांच्याकडून ४ ते ५ हजार रुपये प्रत्येक दिवसाला उकळत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. सदर बोगस डॉक्टरवर तत्काळ कारवाई करून त्याच्याकडील औषध साठा जप्त करण्यात यावा, अशी मागणी येंगळे यांनी तक्रारीतून केली आहे.

रुग्ण नागपूरला रेफर

चिखलापार येथील एक रुग्ण या बोगस डॉक्टरच्या जाळ्यात अडकला. नको ते उपचार केल्यामुळे सदर रुग्णाची प्रकृती अत्यवस्थ झाली आणि त्याला नागपूरला हलवावे लागले. या बोगस दवाखान् रुग्णांना सलाईन व इंजेक्शन लावण्यासाठी सदर बोगस डॉक्टरच्या पत्नीसह अन्य १२ ते १३ वर्षाच्या मुली कार्यरत असल्याचा आरोपही येंगळे यांनी केला आहे.

Web Title: Treatment of corona patients by bogus doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.