११ लाख उच्च रक्तदाब रुग्णांवर उपचार : डॉ. संजीव कुमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:13 IST2019-08-28T00:11:58+5:302019-08-28T00:13:21+5:30
मार्च २०२० पर्यंत उच्च रक्तदाबाचे ११ लाख तर मधुमेहाच्या ३ लाख रुग्णांवर उपचार सुरू करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

११ लाख उच्च रक्तदाब रुग्णांवर उपचार : डॉ. संजीव कुमार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातील जुलै २०१९ पर्यंत ५२,०१८ उच्च रक्तदाबाच्या तर ४०६४ मधुमेह रुग्णांना नियमित औषधोपचार पुरविले जात आहेत. ही योजना २५४ प्राथमिक आरोग्य केंद्र व ६७ नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत घरोघरी जाऊन मधुमेह व उच्च रक्तदाबाचे रुग्ण शोधून उपचार केले जातील. मार्च २०२० पर्यंत उच्च रक्तदाबाचे ११ लाख तर मधुमेहाच्या ३ लाख रुग्णांवर उपचार सुरू करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
संशोधनानुसार ३० वर्षांवरील व्यक्तीपैकी ७ टक्के नागरिक मधुमेह तर २५ टक्के लोक उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहेत; शिवाय गुणवत्तापूर्ण औषधांच्या अभावामुळे ९० टक्केरुग्णांचा औषधोपचार खंडित होतो. या अभियानांतर्गत जागतिक आरोग्य संघटना व राज्य शासनाद्वारे निर्धारित उपचार पद्धतीने रुग्णांना औषधी उपलब्ध करून दिल्या जातील. उच्च रक्तदाब व मधुमेहावर नियंत्रणाद्वारे हृदयविकार, पक्षाघात, मूत्रपिंडाचे विकार आणि रेटिनोपॅथी यासारख्या आजारांवर ५० टक्के नियंत्रण मिळविणे अपेक्षित आहे.
शोधमोहिमेदरम्यान आरोग्य विभागातील एएनएम व आशा, अंगणवाडी सेविका व मदतनीस घरोघरी जाऊन प्रौढ व्यक्तींचे रक्तदाब व मधुमेहाची तपासणी करतील. संशयित रुग्णांची प्रशिक्षित वैद्यकीय अधिकाऱ्याद्वारे तपासणी करून ३० दिवसांचे औषध दरमहा पुरविण्यात येईल. विभागातील ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्र व नागरी आरोग्य तसेच आरोग्यवर्धिनी केंद्रासह आरोग्य उपकेंद्रातून तपासणी केली जाईल. येत्या दीडवर्षात एकूण ४३.४३ लाख नागरिकांची तपासणी करण्याचे नियोजन आहे. ही संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे संजीव कु मार यांनी सांगितले.
वर्धा व भंडारा जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर ही मोहीम राबविण्यात आली होती. योजनांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन उच्चरक्तदाब व मधुमेह नियंत्रणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासणीत उच्च रक्तदाबाचे ५२ हजार तर मधुमेहाचे ४,०६४ रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
आरोग्य उपकेंद्रात बीएएमएस डॉक्टर
उच्च रक्तदाब व मधुमेही रुग्ण शोधमोहिमेला गती मिळावी व मार्च २०२० पर्यंत हे काम पूर्ण व्हावे, यासाठी विभागातील सर्व आरोग्य उपकेंद्रात बीएएमएस डॉक्टर उपलब्ध करणार असल्याची माहिती संजीव कुमार यांनी दिली.