हे विद्यापीठ आहे की खजिन्याचे भांडार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:45 IST2017-08-24T00:45:08+5:302017-08-24T00:45:26+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला विद्येचे मंदिर मानण्यात येते.

हे विद्यापीठ आहे की खजिन्याचे भांडार?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला विद्येचे मंदिर मानण्यात येते. मात्र विद्येच्या या मंदिराची सुरक्षा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. येत्या काही दिवसांत विद्यापीठातील वसतिगृहे, परीक्षा भवन येथेदेखील सुरक्षा वाढविण्यात येणार आहे. प्रशासनाच्या सुरक्षेच्या आग्रहापोटी विद्यापीठाला दरवर्षी सुमारे साडेतीन कोटींहून अधिकचा खर्च करावा लागणार आहे. खर्चाचा आकडा पाहिला तर हे विद्यापीठ आहे की येथे एखादा खजिना दडला आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नागपूर विद्यापीठात विद्यार्थ्यांची आंदोलने, अभ्यागतांचा प्रवेश, वसतिगृहांमधील नियमबाह्य पद्धतीने बाहेरील विद्यार्थ्यांचा संचार यामुळे सुरक्षाव्यवस्थेच्या मर्यादा उघड झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या सुरक्षेची जबाबदारी ‘एमएसएफ’कडे देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. विद्यापीठाच्या वित्त समितीच्या बैठकीत या आशयाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यानंतर व्यवस्थापन परिषदेचीदेखील मान्यता मिळाली. त्यानंतर या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या ‘एमएसएफ’कडे (महाराष्ट्र सिक्युरीटी फोर्स) ही जबाबदारी देण्यात आली. त्यानुसार मुख्य प्रशासकीय इमारतीची सुरक्षा व्यवस्था ‘एमएसएफ’च्या सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेतली. ‘एमएसएफ’कडून प्रशिक्षित सुरक्षारक्षकांना तैनात करण्यात आले आहे. या पहिल्या टप्प्यासाठी वर्षाला अंदाजे एक कोटींचा खर्च होणार आहे.
दुसºया टप्प्यात विद्यापीठ इतर ठिकाणीदेखील सुरक्षाव्यवस्था वाढविणार आहे. यात परीक्षा विभाग, विधी विद्यापीठ परिसर तसेच ‘कॅम्पस’जवळील वसतिगृहे यांचा समावेश आहे. यासाठी २९ आॅगस्ट रोजी होणाºया खरेदी समितीपुढे प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. या टप्प्यासाठी वर्षभराचा सुरक्षेचा खर्च हा २ कोटी ६३ लाख रुपये इतका राहणार आहे. म्हणजेच दोन्ही टप्पे मिळून वर्षाकाठी सुरक्षारक्षकांवर विद्यापीठाला साडेतीन कोटींहून अधिक खर्च करावा लागणार आहे. एकीकडे अनेक विभागांत मूलभूत सुविधांचा अभाव असताना कोट्यवधींचा खर्च कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कंपनीच ठरविते सुरक्षारक्षकांची संख्या
साधारणत: एखाद्या ठिकाणी किती सुरक्षारक्षकांची आवश्यकता आहे हे तेथील प्रशासन ‘एजन्सी’ला सांगते. मात्र ‘एमएसएफ’कडून सुरक्षेसाठी किती लोक लागतील हे स्वत:च ठरविण्यात येते. तितक्या सुरक्षारक्षकांचाच कंत्राट करावा लागतो. विद्यापीठाच्या सुरक्षेच्या दृष्टीनेच हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी सांगितले.