त्या अभियंत्याविरुद्ध मार्चमध्येच रचला होता सापळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 22:07 IST2020-06-26T22:06:06+5:302020-06-26T22:07:27+5:30
लाचखोरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या विजय टाकळीकर यांना मार्च महिन्यातच अटक झाली असती. त्यासाठी एसीबीने सापळाही रचला होता, मात्र तेव्हा टाकळीकरचा फोन न आल्याने पैशाचा व्यवहार झाला नाही, त्यामुळे कारवाई होऊ शकली नाही.

त्या अभियंत्याविरुद्ध मार्चमध्येच रचला होता सापळा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लाचखोरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या विजय टाकळीकर यांना मार्च महिन्यातच अटक झाली असती. त्यासाठी एसीबीने सापळाही रचला होता, मात्र तेव्हा टाकळीकरचा फोन न आल्याने पैशाचा व्यवहार झाला नाही, त्यामुळे कारवाई होऊ शकली नाही. त्यानंतर लॉकडाऊनची घोषणा झाल्याने कारवाईसुद्धा थांबविण्यात आली, अशी माहिती पुढे येत आहे. दरम्यान टाकळीकरच्या अटकेनंतर जिल्हा परिषदेमध्ये खळबळ उडाली आहे. आणखी एक वरिष्ठ अभियंता टार्गेटवर असल्याची चर्चा कंत्राटदार वर्तुळामध्ये आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी एसीबीची एका टीमने टाकळीकरच्या घरी धाड मारली. तेथून १८ लाख रुपये मिळाल्याची माहिती आहे तर दुसरी टीम जि.प.मध्ये होती. टाकळीकर यांच्या गाडीमध्ये पैसे ठेवले होते. पण टाकळीकर सीईओंकडे असल्यामुळे एसीबीच्या पथकाने सीईओंच्या कक्षातून त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणात तक्रारकर्ते हे कंत्राटदार आहे. त्यांच्या कामाचे बिल काढून देण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून टाकळीकर लाचेची मागणी करीत होते. विशेष म्हणजे टाकळीकर आणि कंत्राटदारांमध्ये वाद होता. टाकळीकरच्या बदलीमध्ये कंत्राटदाराचा हात असल्याचे असे ते स्वत: सांगायचे. असे असतानाही टाकळीकरने त्याच्याकडून लाच मागून स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतल्याची चर्चा जि.प.मध्ये आहे.
चार दिवसाचा पीसीआर
आज एसीबीने टाकळीकर आणि रेवतकर यांना न्यायालयापुढे हजर केले. जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी सरकारची तर अॅड. कैशाल डोडानी आणि अॅड. कमल सतुजा यांनी आरोपींची बाजू मांडली. लाचेची रक्कम मोठी असल्याने या गुन्ह्यात अन्य आरोपींचा सहभाग राहू शकतो असे सांगत एसीबीने आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली. यावर न्यायालयाने आरोपींना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.