ई-चलान करणार गुन्हेगारांना ट्रॅप
By Admin | Updated: March 22, 2015 02:25 IST2015-03-22T02:25:06+5:302015-03-22T02:25:06+5:30
वाहन चोरट्यांना चाप लावण्यासाठी, वाहतूक नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी...

ई-चलान करणार गुन्हेगारांना ट्रॅप
नरेश डोंगरे नागपूर
वाहन चोरट्यांना चाप लावण्यासाठी, वाहतूक नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी उपयुक्त ठरणारी ई-चलान प्रणाली नागपूर ग्रामीण पोलीस लवकरच कार्यान्वित करणार आहे. त्यासंबंधीचे सॉफ्टवेअर पोलिसांनी तयार केले असून, त्याची ट्रायलही झाली आहे.
किरकोळ तांत्रिक बाबींची पूर्तता होताच या उपक्रमाची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू होणार आहे. दंडाची रक्कम किरकोळ असल्यामुळे काही वाहनचालक वारंवार वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करतात. पकडले गेल्यास चलान पावती हातात मिळत असल्यामुळे त्याने यापूर्वी असाच गुन्हा कितीवेळा केला, ते उघडच होत नाही. दुसरे म्हणजे, कारवाईचा धाक दाखवून काही पोलीस कर्मचारी वाहनचालकाकडून रक्कम उकळतात. याशिवाय अनेक गुन्हेगार गुन्हा करण्यासाठी चोरीच्या वाहनाचा वापर करतात.
राज्यात पहिल्यांदाच!
कर्नाटकची राजधानी बंगरूळु आणि आंध्र प्रदेशातील हैदराबाद येथे सध्या पोलिसांकडून ई चलान प्रणालीचा वापर केला जात आहे. लवकर नागपूर जिल्ह्यात ही प्रणाली सुरू होणार असल्यामुळे ई प्रणाली सुरू करणारे नागपूर ग्रामीण पोलीस राज्यात पहिले ठरणार आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी नागपूर ग्रामीण पोलिसांनी निर्भया, अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय व पोलीस मदत मिळवून देण्यासाठी सुरू केलेले मोबाईल अॅप, पासपोर्ट सेवा आणि पोलीस कर्मचाऱ्यांना वाढदिवसाची शुभेच्छा देणारा मॅसेज हे उपक्रम राबवून राज्य पोलीस दलात वेगळे स्थान निर्माण केले आहे.