नागपुरात ट्रान्सपोर्टरला सव्वाचार लाखांचा चुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 08:25 PM2019-12-10T20:25:07+5:302019-12-10T20:26:29+5:30

विश्वासू म्हणून तीन वर्षांपासून काम करणाऱ्या एका आरोपीने ट्रान्सपोर्टरला सव्वाचार लाखांचा चुना लावला.

Transporter in Nagpur cheated by four and quarter lac rupees | नागपुरात ट्रान्सपोर्टरला सव्वाचार लाखांचा चुना

नागपुरात ट्रान्सपोर्टरला सव्वाचार लाखांचा चुना

Next
ठळक मुद्देरक्कम उचलली, जमाच केली नाही : ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विश्वासू म्हणून तीन वर्षांपासून काम करणाऱ्या एका आरोपीने ट्रान्सपोर्टरला सव्वाचार लाखांचा चुना लावला. रवींद्र राजम कलवला (वय ४१) असे आरोपीचे नाव आहे. तो चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरचा रहिवासी आहे.
उमरेड मार्गावरील प्यारे खान जियाखान (वय ४३) हे ट्रान्सपोर्टर आहेत. त्यांच्याकडे आरोपी रवींद्र ट्रकचालक म्हणून १ मार्च २०१७ पासून कामाला होता. त्याला त्यासाठी ४५०० रुपये पगार दिला जात होता. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी माल पोहचवला तेथून मालाची रक्कम घेऊन येण्यापोटी ७०० रुपये मासिक कमिशन दिले जात होते. आरोपीने चंद्रपूरच्या जयस्वाल अ‍ॅन्ड कंपनीतून २९ जून ते १० ऑगस्ट २०१९ या कालावधीत ४ लाख २१ हजार ७०० रुपये तसेच १ लाख ९२ हजारांचा धनादेश घेतला. हा धनादेश त्याने प्यारे खान यांच्या ट्रान्सपोर्ट कार्यालयात जमा केला. मात्र, ४,२१,७०० रुपयांची रोकड जमा केली नाही. अनेक दिवसांपासून जयस्वाल यांच्याकडे ती रक्कम बाकी आहे, असा समज झाल्याने प्यारे खान यांच्याकडून जयस्वाल यांना विचारणा झाली. त्यानंतर रवींद्रचे बिंग फुटले. त्याने ही रक्कम चार महिन्यांपूर्वीच नेल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे प्यारे खान यांनी रवींद्रला रकमेबाबत विचारणा केली. त्याने ती रक्कम खर्च केल्याचे सांगून आज देतो, उद्या देतो, असे म्हणत आतापर्यंत टाळाटाळ केली. काही दिवसांपासून मात्र त्याने रक्कम देण्यास नकार देऊन तुमच्याकडून जे होते, ते करून घ्या असे म्हटले. त्याने विश्वासघात केल्याचे लक्षात आल्याने प्यारेखान यांनी हुडकेश्वर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

Web Title: Transporter in Nagpur cheated by four and quarter lac rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.