वर्षानुवर्षे एकाच टेबलावर ठाण मांडून असलेल्यांच्या बदल्या?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 20:18 IST2020-07-16T20:16:47+5:302020-07-16T20:18:21+5:30
नियमानुसार वर्ग-१ व वर्ग-२ मधील अधिकाऱ्यांची दर तीन वर्षांनी तर वर्ग -३ च्या कर्मचाऱ्यांची पाच आणि वर्ग-४ कर्मचाºयांची सात वर्षांनी बदली करण्याचे नियम आहे. परंतु महापालिकेतील पदाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कृपेने अनेक अधिकारी वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसले आहेत. अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या हालचाली प्रशासन स्तरावर सुरू झाल्या आहेत.

वर्षानुवर्षे एकाच टेबलावर ठाण मांडून असलेल्यांच्या बदल्या?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नियमानुसार वर्ग-१ व वर्ग-२ मधील अधिकाऱ्यांची दर तीन वर्षांनी तर वर्ग -३ च्या कर्मचाऱ्यांची पाच आणि वर्ग-४ कर्मचाºयांची सात वर्षांनी बदली करण्याचे नियम आहे. परंतु महापालिकेतील पदाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कृपेने अनेक अधिकारी वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसले आहेत. अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या हालचाली प्रशासन स्तरावर सुरू झाल्या आहेत.
महापालिकेच्या कुठल्या विभागात अधिकारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी आहेत, याची माहिती सामान्य प्रशासन विभागाकडून घेतली जात आहे. नियमानुसार बदली अपेक्षित असतानाही बदली का करण्यात आली नाही, याचा शोध घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना दुसऱ्या विभागात पाठविले जाणार आहे. अधिकाऱ्यांच्या बैठकीत मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबतचे संकेत दिले.
झोनल स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या बदल्या त्यांच्या निवासाच्या क्षेत्रा व्यतिरिक्त इतरत्र करण्याचे निर्देश आहेत. मात्र शेकडो कर्मचारी एकाच कार्यालयात वर्षानुवर्षे कार्यरत आहेत. विशेष म्हणजे याची आकडेवारीसुद्धा सामान्य प्रशासन विभागाकडे उपलब्ध नाही. एकाच टेबलवर वर्षानुवर्षे काम करीत असल्याने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू आहे. सर्वसामान्य नागरिकांना कामासाठी चकरा माराव्या लागतात. याला निर्बंध घालण्यासाठी तीन वर्षाहून अधिक कार्यकाळ झालेल्या अधिकाºयांची बदली करणे आवश्यक आहे.
टॅक्स व नगररचना विभागासाठी आग्रह
मनपाच्या नगररचना व टॅक्स विभागात अनेक अधिकारी व वर्ग -३ चे कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी काम करत आहते. याच विभागात कायम ठेवावे, असा त्यांचा आग्रह असतो. दुसºया विभागात जाण्याची त्यांची इच्छा नाही. यामागे 'अर्थकारण' असल्याची चर्चा आहे. काही ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या मर्जीतील अधिकारी असल्याने सामान्य प्रशासनाकडूनही त्यांच्या बदलीबाबत विचार केला जात नाही.
पदाधिकाऱ्यांच्या कक्षापुढे कर्मचारी बसून
मनपातील पदाधिकाऱ्यांच्या कक्षात गरजेपेक्षा अधिक वर्ग - ४ चे कर्मचारी आहेत. काही काही कक्षापुढे हे कर्मचारी दिवसभर नुसते बसून असतात. त्यांना कुठल्याही स्वरूपाचे काम नसल्याने त्यांच्या गप्पा सुरू असतात. अनेकजण कार्यालयीन वेळेत भटकंती करीत असतात. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
गरज असलेल्या विभागात कर्मचारी नाहीत
महापालिकेचे उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत असलेल्या टॅक्स , बाजार व नगररचना विभागात मंजूर पदाच्या तुलनेत कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. दुसरीकडे काही भागातील कर्मचारी कामाविना बसून असतात. याचा मनपाच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. काम नसलेल्यांना या विभागात पाठवण्याची गरज आहे.