: पोलीस अधिकाऱ्यांच्या मानसिकतेत सुखद बदलनरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मायानगरी मुंबईतून आम्हाला थेट नक्षल्यांच्या गुहेत बदली पाहिजे आहे, अशी विनंती राज्य पोलीस दलातील पाच, दहा नव्हे तर तब्बल ६४ पोलीस अधिकाऱ्यांनी केली आहे. पहिल्यांदाच हा आश्चर्यकारक तेवढाच सुखद बदल पोलीस अधिकाऱ्यांच्या मानसिकतेतून पुढे आला आहे. मात्र, पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक २ च्या बैठकीत बदलीचे अधिकार असलेल्या अधिकाऱ्यांनी या सर्वच्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांची गडचिरोलीची बदली विनंती अमान्य करून संबंधित वर्तुळाला जोरदार धक्का दिला आहे.गृहखाते सांभाळणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य पोलीस दलाला स्मार्ट आणि अधिक निडर बनविण्याचे प्रयत्न चालविले आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या पोलिसांमध्ये बघायला मिळत आहे. रुक्ष आणि भकास पोलीस ठाण्यांचा परिसर स्मार्ट झालेला आहे. अनेक गंभीर गुन्ह्यांचा छडा तातडीने लागताना दिसतो आहे. पहिल्यांदाच अनेक महानगरातील क्राईम रेट कमी आणि कन्विक्शन रेट वाढताना दिसतो आहे. याहीपेक्षा सर्वात सुखद परिणाम पोलिसांच्या बदलत्या मानसिकतेतून दिसत आहे. पोलीस आस्थेने आणि अधिक निडरपणे वागू लागले आहेत. अगदी गेल्या वर्षीपर्यंत गडचिरोलीत बदली होणे म्हणजे ‘काळ्यापाण्याची शिक्षा’असा एक समज शासकीय यंत्रणेत दृढ झाला होता. त्यामुळे नक्षलवाद्यांची गुहा समजल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात बदली मागण्याचे सोडा, या जिल्ह्यात झालेली बदलीरद्द करण्यासाठी संबंधित अधिकारी कर्मचारी जीवाचा आटापिटा करीत होते. प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही बदली होत नसेल तर संबंधित अधिकारी आजारी रजेवर जाण्याचा किंवा ऐच्छिक निवृत्ती घेण्याचाही पवित्रा घेत होते. शासनाचे अन्य विभागच नव्हे तर पोलीस खातेही त्याला अपवाद नव्हते. गडचिरोलीत बदली झालेले पोलीस अधिकारी शेवटपर्यंत तेथे रुजूच झाले नाही, अशी अनेक उदाहरणे आहेत.विशेष म्हणजे, राज्यातील गडचिरोली, गोंदिया, नंदूरबारसारख्या जिल्ह्यात सेवा देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना अन्य जिल्ह्याच्या तुलनेत दीडपट पगार मिळतो. तरीसुद्धा ‘पैशाचे काय करायचे, गडचिरोलीत जाऊन नक्षलवाद्यांशी लढून शहीद होण्यापेक्षा निवृत्ती घेतलेली बरी नाही का’, असा प्रतिप्रश्न करून संबंधित मंडळी खचलेल्या मानसिकतेचा परिचय देत होती. परंतु गेल्या काही महिन्यात गृहमंत्रालय, पोलीस महासंचालनालयातून वेगवेगळ्या पद्धतीने पोलीस दलाला मिळत असलेला बूस्टर डोज, खुद्द मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांच्या पाठीवर ठेवला जाणारा हात आणि गडचिरोलीच्या जंगलात नक्षल्यांशी निधड्या छातीने लढणाऱ्या पोलिसांनी या मानसिकतेत बदल होईल, अशी जोरदार कामगिरी बजावली आहे. परिणामी गडचिरोलीतील नक्षलवाद कधी नव्हे एवढा बॅकफूटवर गेला आहे. त्यामुळे आपणही गडचिरोलीत जाऊन नक्षल्यांसोबत दोन हात करायला हवे, अशी मानसिकता आता नव्या दमाच्या पोलीस अधिकाऱ्यांची झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या ६४ पोलीस उपनिरीक्षकांनी गेल्या महिन्यात मायानगरीतून (मुंबईतून) आम्हाला थेट नक्षल्यांच्या गुहेत (गडचिरोलीला) बदली पाहिजे, असे विनंतीअर्ज केले होते. २३ मे रोजी झालेल्या पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक २ च्या बैठकीत बदलीचे अधिकार असलेल्या अधिकाऱ्यांनी या सर्वच्यासर्व पोलीस अधिकाऱ्यांची गडचिरोलीची बदली विनंती अमान्य करून संबंधित वर्तुळाला जोरदार धक्का दिला.बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयात पोलीस उपनिरीक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. अशात या उपनिरीक्षकांना बृहन्मुंबईतून गडचिरोलीत पाठविल्यास बृहन्मुंबईत कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून ज्या ६४ पोलीस उपनिरीक्षकांनी गडचिरोलीत बदली होण्यासंबंधी विनंती केली होती त्या सर्वांची विनंती अमान्य करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (आस्थापना) डॉ. प्रज्ञा सरवदे यांनी नुकत्याच काढलेल्या आदेशपत्रातून कळविले आहे. या दोन्ही परस्परविरोधी घडामोडीमुळे राज्य पोलीस दलात चर्चेचे मोहोळ उडाले आहे.पोलीस दलासाठी अभिमानास्पदच्बृहन्मुंबईसारख्या ठिकाणाहून एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलीस उपनिरीक्षक गडचिरोलीत सेवा देण्यासाठी स्वत:हून तयारी दाखवतात ही केवळ आमच्याचसाठी नव्हे तर राज्य पोलीस दलासाठी अभिमानाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया गडचिरोली-गोंदिया परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक अंकुश शिंदे यांनी नोंदवली. गडचिरोली-गोंदियातील नक्षलवाद नाहीसा करण्यासाठी या मानसिकतेचा खूप मोठा फायदा होईल, असेही ते लोकमतशी बोलताना म्हणाले.
मायानगरीतून नक्षल्यांच्या गुहेत बदली द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 10:19 IST
: पोलीस अधिकाऱ्यांच्या मानसिकतेत सुखद बदलनरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मायानगरी मुंबईतून आम्हाला थेट नक्षल्यांच्या गुहेत बदली पाहिजे आहे, अशी विनंती राज्य पोलीस दलातील पाच, दहा नव्हे तर तब्बल ६४ पोलीस अधिकाऱ्यांनी केली आहे. पहिल्यांदाच हा आश्चर्यकारक तेवढाच सुखद बदल पोलीस अधिकाऱ्यांच्या मानसिकतेतून पुढे आला आहे. मात्र, पोलीस आस्थापना मंडळ ...
मायानगरीतून नक्षल्यांच्या गुहेत बदली द्या
ठळक मुद्दे६४ पोलीस अधिकाऱ्यांची मागणी अमान्य