म्हसेपठार गावात काठी पूजनाची परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:15 IST2021-03-13T04:15:28+5:302021-03-13T04:15:28+5:30
मोहपा : म्हसेपठार येथे महाशिवरात्रीनिमित्त काठी पूजनाची २१५ वर्षांपासून परंपरा आहे. अमरावती जिल्ह्यातील पुसला (वरुड) आणि काटोल तालुक्यातील रिधोरा ...

म्हसेपठार गावात काठी पूजनाची परंपरा
मोहपा : म्हसेपठार येथे महाशिवरात्रीनिमित्त काठी पूजनाची २१५ वर्षांपासून परंपरा आहे.
अमरावती जिल्ह्यातील पुसला (वरुड) आणि काटोल तालुक्यातील रिधोरा येथेही बीडकर कुटुंबीय काठी काढायचे. काळाच्या ओघात तेथील प्रथा बंद पडल्या. परंतु म्हसेपठारच्या बीडकर कुटुंबीयांनी ही परंपरा आजही जोपासली आहे. येथील धनराज बीडकर यांची काठी काढणारी ही सहावी पिढी आहे. सुरुवातीला फक्त बीडकर कुटुंबांची महाशिवरात्रीच्या पूजेची पद्धत असणारी ही काठी आज गावाचे दैवत व ओळख बनली आहे.
पूर्वी काठी ४० फूट लांब असायची. सध्या फक्त २० ते २५ फूट लांबीची काठी वापरली जाते. पचमढी येथे महादेवाच्या यात्रेला जाऊन बीडकर कुटुंब काठी आणतात. दर तिसऱ्या वर्षी काठी बदलतात. पूर्ण काठीला भगव्या रंगाच्या कापडी पट्ट्या गुंडाळतात. काठीला खालून पाच फूट उंचीवर एक लाकडी पाट असतो. पाटावर देवांच्या मूर्ती ठेवतात. काठीचे वजन सुमारे ४० किलो असते. काठी सरळ ठेवून खांद्याचा आधार देत, दोन डफ वाजवीत पंचक्रोशीतील घरोघरी नेली जायची. महाशिवरात्रीच्या दहा-बारा दिवस आधी काठी घेऊन बीडकर कुटुंब पायी प्रवासाला निघायचे. परंतु टीव्ही केबल, दूरध्वनी व विजेच्या तारा चुकवीत काठी घेऊन चालणे जिकिरीचे होत असल्याने आता फक्त दोनच दिवस काठी काढली जाते. महाशिवरात्रीला मोहपा आणि दुसरे दिवशी म्हसेपठार येथे काठी पूजन होते.
आता रस्त्याने जाताना ज्यांनी बोलाविले त्यांच्याच दारात काठी नेतात. भाग्यात असेल तर काठीची पूजा करायला मिळते, असे मानणारा महिलावर्ग अद्यापही आहे. घरोघरी महिला काठीची पूजा करतात, ओटी भरतात, दान करतात. पूजेच्या वेळी महादेवाच्या आरत्या म्हटल्या जातात. महाशिवरात्रीच्या दुसरे दिवशी म्हसेपठारला दोन्ही हात सोडून हनुवटीवर, तीन बोटांवर, तळहातावर, मस्तकावर, बाहूवर व हाताच्या अंगठ्यावर काठी नाचविली जाते. दुसरे दिवशी पूजेनंतर काठी सोडून घराच्या वळचणीला आडवी बांधून ठेवतात. पूजेतील दानात मिळालेले कापड सालबर्डीच्या महादेव यात्रेत दान केले जाते. बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या धनराज बीडकर यांनी हा पारंपरिक ठेवा जोपासला आहे.