बाजार समित्यांमध्ये व्यापारी, अडतिये ठरवितात कृषी मालाचा भाव! ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:26 IST2020-12-12T04:26:54+5:302020-12-12T04:26:54+5:30

रिॲलिटी चेक मोरेश्वर मानापुरे नागपूर : कळमन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य बाजारात दरवर्षी सोयाबीन, धान, तूर, गहू आणि ...

Traders in market committees decide the prices of agricultural commodities! () | बाजार समित्यांमध्ये व्यापारी, अडतिये ठरवितात कृषी मालाचा भाव! ()

बाजार समित्यांमध्ये व्यापारी, अडतिये ठरवितात कृषी मालाचा भाव! ()

रिॲलिटी चेक

मोरेश्वर मानापुरे

नागपूर : कळमन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य बाजारात दरवर्षी सोयाबीन, धान, तूर, गहू आणि चण्याची सर्वाधिक उलाढाल होते. नागपूर जिल्ह्यातील १३ बाजार समित्यांमध्ये व्यापारी व अडतिया म्हणेल तोच भाव वा लिलावादरम्यान निश्चित केलेला भाव अथवा कृषी मालाचा दर्जा पाहून शेतकऱ्यांना हमीभाव मिळतो काय, अशा अनेकविध प्रश्नांची उत्तरे अजूनही अनुत्तरित आहेत. शेतकऱ्यांना कृषी मालाला भाव कसा मिळतो, याचे रिअ‍ॅलिटी चेक केले असता अडतिया आणि व्यापारी म्हणेल तोच भाव शेतकऱ्यांना मिळत असल्याची खात्रीलायक माहिती पुढे आली आहे. व्यापारी आणि अडतियांकडून शेतकऱ्यांना मालाची रोख रक्कम मिळत असल्याने त्यांनाच माल विकण्याची शेतकऱ्यांची जास्त पसंती असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विविध बाजार समित्यांच्या तुलनेत कळमना धान्य बाजारात दररोज ५ कोटींपेक्षा जास्तची उलाढाल होते. यानुसार मालाच्या आवकीचा अंदाज लावता येतो. सध्या धानाची आवक वाढली आहे, पण गेल्या वर्षीच्या तुलनेत कमीच आहे. सध्या ९ ते १० हजार क्विंटल पोते विक्रीसाठी येत आहेत. यावर्षी केंद्र सरकारने भात/धान १८६८ आणि भात/धान (ए ग्रेड) १८८८ रुपये क्विंटल हमीभाव निश्चित केला आहे. शिवाय शासनाच्या केंद्रावर धान विकल्यास ७०० रुपये अतिरिक्त बोनस राज्य शासनाने घोषित केला आहे. पण शासनाचे धान खरेदीचे नियम कठीण असल्याने शेतकरी धान विक्रीसाठी जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये जातात. धान खरेदीनंतर त्यांच्या खात्यात व्यापारी वा अडतिया आरटीजीएसने पैसे ट्रान्सफर करतात. त्यामुळे त्यांच्याकडे शेतकऱ्यांचा कल जास्त आहे.

शासनाच्या केंद्रापेक्षा मिळतो कमी भाव

यावर्षी कळमन्यात सोयाबीनची आवक फारच कमी आहे. दर्जाही खालावला आहे. त्यामुळे हमीभाव ३८८० रुपयांच्या तुलनेत ३ हजारांपर्यंत अर्थात हमीभावापेक्षा कमी भाव मिळाला. सध्या दररोज ८०० ते १००० पोत्यांपर्यंत आवक आहे. शुक्रवारी ३९०० ते ४३३४ रुपये भाव अर्थात हमीभावापेक्षा जास्त भाव मिळाला. सध्या धानाला दर्जा पाहून २ हजार ते २३०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. पुढे धानाची आवक वाढणार आहे. त्यानंतर तूर आणि फेब्रुवारी व मार्चमध्ये गहू व चणा विक्रीसाठी येईल. प्रत्येक मालाचा कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लिलाव होतो आणि मालाचा भाव ठरविला जातो. त्यामुळे मालाला उचित भाव मिळतो, असे अडतिये कमलाकर घाटोळे यांनी सांगितले.

धान खरेदीचे शासनाचे नियम कठीणच

शासनाच्या केंद्रावर शेतकऱ्यांना आपल्या पोत्यात धान विक्रीसाठी न्यायचे आहेत. या ठिकाणी शासनाने देऊ केलेल्या पोत्यात शासनाचे कर्मचारी शेतकऱ्यांना धान भरायला सांगतात. यात ४० किलो धानाची भरती यायला हवी. न आल्यास माल रिजेक्ट केला जातो. अशी शासनाची खरेदीची पद्धत आहे. अनेक शेतकरी १८६८ रुपये भाव आणि त्यावर ७०० रुपये बोनस मिळविण्यासाठी केंद्रावर जातात. पण शासनाच्या अटी पूर्ण न झाल्याने अखेर धान कळमन्यात विक्रीसाठी आणतात. त्यामुळे कळमन्यात सध्या धानाची आवक वाढली आहे.

दिवाळीनंतर धान आणि सोयाबीनची आवक वाढली आहे. सध्या धानाचा सिझन आहे. शेतकऱ्यांना धानाची व्हेरायटी आणि गुणवत्तेनुसार २ हजार ते २३०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. मालाची रक्कम त्यांच्या खात्यात आरटीजीएसने ट्रान्सफर करण्यात येत असल्याने कळमन्यात माल आणण्याकडे त्यांना जास्त ओढा आहे. हीच स्थिती दरवर्षी तूर, गहू आणि चण्याची असते.

कमलाकर घाटोळे, अडतिया, कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती.

कळमना धान्य बाजारात मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी समितीच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत धान्याचा लिलाव केला जातो. या सर्व व्यवहारात पारदर्शकता असते. त्यामुळे व्यापारी वा अडतिया भाव ठरवितात, यात शंका घेण्याचे कारण नाही. शेतकऱ्यांना धान्य कळमन्यात वा शासनाच्या केंद्रावर विकण्याची मुभा आहे. भाव मिळेल तिथे धान्य विकण्यास शेतकरी मोकळे आहेत.

राजेश भुसारी, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती.

कळमन्यात मालाला चांगला भाव मिळत असल्याने शासनाच्या केंद्राऐवजी कळमन्यात धान्य विक्रीला प्राधान्य देतो. दरवर्षी सोयाबीन, धान, तूर, चण्याची विक्री करतो. यंदा सोयाबीन आणि धानाला चांगला भाव मिळत आहे. केंद्रावर धानाचा बोनस उशिरा मिळतो.

गणेश काळे, शेतकरी, कुसुंबी, नागपूर तालुका.

शासनाच्या अटीमुळे यंदा कळमन्यात धान विक्रीसाठी आणले. शासनाच्या हमीभावाच्या तुलनेत भावही चांगला मिळाला. शासनाच्या केंद्रावर धानाला १८६८ रुपये आणि ७०० रुपये बोनस मिळतो. त्यापेक्षा २३०० रुपयांचा रोखीचा व्यवहार परवडणारा आहे. सोयाबीनला हमीभावापेक्षा जास्त भाव मिळाला.

ज्ञानेश्वर ठाकरे, शेतकरी, मांढळ, नागपूर तालुका.

सोयाबीन

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीनचे ३० टक्के पीक आले आणि मालाचा दर्जाही खालावलेला होता. सोयाबीनला ३८८० रुपये भाव शासनाने ठरविला आहे. मुहूर्तावर भाव ४५०० रुपयांपर्यंत गेला होता. नंतर ३ ते ३५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. सध्या ८०० ते एक हजार पोत्यांची आवक आहे. मालाची उपलब्धता पाहून शुक्रवारी ३९०० ते ४३३४ रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना भाव मिळाला. दिवसेंदिवस सोयाबीनची आवक कमी होत आहे.

धान

सध्या धानाचा सिझन असल्याने कळमन्यात दररोज ८ ते १० हजार पोत्यांपर्यंत आवक आहे. पुढे वाढणार आहे. शासनाच्या केंद्रावर धान आणि बोनसची रक्कम मिळण्यास उशीर होत असल्याने शेतकरी कळमना आणि जिल्ह्यातील अन्य बाजार समित्यांमध्ये धान विक्री करीत आहेत. केंद्रावर हमीभाव आणि बोनससह २५६८ रुपये भाव मिळतो. त्यानंतरही शेतकरी बाजार समितीत २ हजार ते २३०० रुपये क्विंटलने धान विक्रीला प्राधान्य देत आहेत.

कृषी मालाची आधारभूत किंमत (क्विंटलमध्ये)

भात/धान १८६८

भात/धान (ए ग्रेड) १८८८

ज्वारी २६२०

बाजारी २१५०

नाचणी ३२९५

मका १८५०

तूर ६०००

मूग ७१९६

उडीद ६०००

सोयाबीन ३८८०

Web Title: Traders in market committees decide the prices of agricultural commodities! ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.