तोतलाडोह ओव्हरफ्लो: धरणाचे सर्व १४ दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 10:45 PM2019-09-11T22:45:01+5:302019-09-11T22:45:30+5:30

जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण असलेले तोतलाडोह बुधवारी ओव्हरफ्लो झाले. सायंकाळपर्यंत या धरणाचे ६ दरवाजे उघडण्यात आले होते. परंतु पाण्याची येणे मोठ्या प्रमाणावर सुरूच असल्याने रात्री ८ वाजता सर्वच्या सर्व १४ दरवाजे ३० सेंटीमीटरपर्यंत उघडून पाणी सोडण्यात आले.

Totladoh overflow: All 14 doors of the dam are opened | तोतलाडोह ओव्हरफ्लो: धरणाचे सर्व १४ दरवाजे उघडले

तोतलाडोह ओव्हरफ्लो: धरणाचे सर्व १४ दरवाजे उघडले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण असलेले तोतलाडोह बुधवारी ओव्हरफ्लो झाले. सायंकाळपर्यंत या धरणाचे ६ दरवाजे उघडण्यात आले होते. परंतु पाण्याची येणे मोठ्या प्रमाणावर सुरूच असल्याने रात्री ८ वाजता सर्वच्या सर्व १४ दरवाजे ३० सेंटीमीटरपर्यंत उघडून पाणी सोडण्यात आले. प्रति सेकंद ४४४ क्युबिक मीटर पाणी सोडले जात आहे. वीज उत्पादनाने १२० क्युबिक मीटर पाणी सोडले जात आहे. याच गतीने पाणी सुरू राहिले तर गुरुवारी नवेगाव खैरी येथील धरणही ओव्हरफ्लो होऊ शकते. तोतलाडोह भरल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांना मोठा आनंद झाला आहे.
मध्य प्रदेशातील चौराई (जि. छिंदवाडा) येथील धरणामुळे यंदा तोतलाडोह संकटात सापडला होता. पाऊस होत नसल्याने धरणातील पाणीसाठा आटला होता. डेड स्टॉकमधून पाणी वापरावे लागले. इतकेच नव्हे तर पिण्याचे पाणी पुरावे म्हणून शहरात एक दिवसाआड पाणी सोडण्याची वेळ आली. गेल्या १५ऑगस्टपासून परिस्थिती सुधारली. मध्य प्रदेशात अतिवृष्टीने चौराई धरण भरलेय. त्याचे दोन गेट उघडल्याने तोतलाडोहमध्ये पाणी साचू लागले. २३ ऑगस्टपर्यंत तोतलाडोह येथील पाणीसाठा १२.२० टक्क्यांवर वाढला. २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता चौराई धरणाचे ६ दरवाजे उघडले. त्यामुळे ४८ तासातच तोतलाडोहमधील पाणीसाठ्यात १८ टक्के वाढ झाली. ३० टक्क्यांपर्यंत तो पोहोचला. मध्य प्रदेशात सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चौराई धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले जात आहे. परिणामी तोतलाडोह धरण भरू लागले. इतकेच नव्हे तर बुधवारी तो ओव्हरफ्लो (९५ टक्क्यांपेक्षा अधिक) झाला.

असा वाढत गेला पाणीसाठा
१० ऑगस्ट - ० टक्के
२३ ऑगस्ट - १३.२६ टक्के
२७ऑगस्ट - २२.७० टक्के
१ सप्टेंबर - ३६.८९ टक्के
६ सप्टेंबर - ५८ टक्के
९ सप्टेंबर - ८६ टक्के
१० सप्टेंबर - ९० टक्के
११ सप्टेंबर - ओव्हरफ्लो (९५ टक्के)

१.२० लाख हेक्टरचे सिंचन अवलंबून
नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील १ लाख २० हजार हेक्टर क्षेत्रातील सिंचन तोतलाडोह धरणावर अवलंबून आहे. पेंच सिंचन विभागाचे उपविभागीय अभियंता राजेश धोटे यांच्यानुसार ७० हजार हेक्टरमध्ये धान रोवले जाते. यासाठी एका पाळीत १५० दलघमी इतक्या पाण्याची गरज असते. धानासाठी दोन पाळीत पाणी दिले जाते. १०० दलघमी पाणी अन्य वापरासाठी दिले जाते. वर्षभरात ६०० दलघमी पाण्याची आवश्यकता असते.
चार वर्षानंतर धरण हाऊसफु्ल्ल
तोतलाडोह धरण चार वर्षानंतर हाऊसफुल्ल झाले आहे. यापूर्वी २०१५ मध्ये हे धरण पूर्णपणे भरले होते. १९८९ मध्ये मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवरबनलेल्या तोतलाडोह धरणाचा कॅचमेंट एरिया ४२७३ वर्ग किलोमीटर आहे. धरणातील डेड स्टॉक १५० दलघमी आहे, तर उपयुक्त पाणीसाठा १०१६.८८ दलघमी आहे. तोतलाडोहपासून चौराई धरणाचे अंतर ११० किमी आहे. तोतलाडोह धरणाच्या भरवशावर १६० मेगावॅट विजेचे उत्पादनही केले होते. यातून ६६ टक्के वीज मध्यप्रदेशला तर उर्वरित वीज महाराष्ट्राला मिळते.
नवेगाव (खैरी) येथील पेंच धरण १९७७ मध्ये बनले. या धरणातील डेड स्टॉक ३० दलघमी आहे. येथील उपयुक्त साठा १४१.७४ दलघमी आहे. तोतलाडोहपासून याचे अंतर ३० किमी आहे. या धरणाच्या उजव्या कालव्यातून नागपूर शहर आणि डाव्या कालव्यातून पारशिवनी, रामटेक, मौदा तालुका आणि भंडाऱ्या जिल्ह्यात सिंचनासाठी पाणी सोडले जाते.

रब्बी व खरीपसाठी सोडणार पाणी
दरम्यान तोतलाडोह धरण हाऊसफुल्ल झाल्यामुळे साऱ्यांनाच आनंद झाला आहे. धरण भरल्याने पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठीही पाणी उपलब्ध झाले आहे. तेव्हा रब्बी आणि खरीप अशा दोन्ही हंगामासाठी आता तोतलाडोहचे पाणी सोडले जाईल, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रपरिषदेत जाहीर केले.
नदीकाठच्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा
तोतलाडोह धरणातील सर्व दरवाजे उघडण्यात आल्याने नदीकाठावर राहणाऱ्या गावकऱ्यांना आधीच सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. तोतलाडोह येथील सोडलेल्या पाण्यामुळे नवेगाव खैरी येथील धरण भरेल. ते धरण पूर्णपणे भरल्यानंतर पाणी नदीमध्ये सोडले जाईल. ते सोडतानाही विशेष काळजी घेतली जात आहे. नदीपात्राबाहेर पाणी जाऊ नये. पात्राबरोबरच पाणी वाहत जावे, जेणेकरून नदीकाठी राहणाऱ्या गावाला व नागरिकांना कुठलाही धोका होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. तसेच आवश्यक उपाययोजनांसाठी यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहे.
अश्विन मुदगल, जिल्हाधिकारी

Web Title: Totladoh overflow: All 14 doors of the dam are opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.