तोतलाडोह ‘ओव्हरफ्लो’च्या दिशेने : ८७.३६ टक्के भरले धरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 11:25 PM2019-09-09T23:25:40+5:302019-09-09T23:30:00+5:30

महिनाभरापूर्वी ज्या तोतलाडोह धरणातील पाणीसाठा डेडस्टॉकच्याही खाली गेला होता तो आज ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. सोमवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत येथील पाणीसाठा ८७.३६ टक्के इतका झाल्याची माहिती आहे.

Totladoh in the direction of 'overflow':87.36% filled dam | तोतलाडोह ‘ओव्हरफ्लो’च्या दिशेने : ८७.३६ टक्के भरले धरण

तोतलाडोह ‘ओव्हरफ्लो’च्या दिशेने : ८७.३६ टक्के भरले धरण

googlenewsNext
ठळक मुद्दे२४ तासात १३ टक्के पाणी वाढलेचौराई धरणातील सहा गेटमधून सोडले जात आहे १४०० क्युसेक पाणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महिनाभरापूर्वी ज्या तोतलाडोह धरणातीलपाणीसाठा डेडस्टॉकच्याही खाली गेला होता तो आज ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. सोमवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत येथील पाणीसाठा ८७.३६ टक्के इतका झाल्याची माहिती आहे. इतकेच नव्हे तर येणाऱ्या एक-दोन दिवसात यातून पाणी सोडण्याचीही वेळ येऊ शकते. यादरम्यान पाटबंधारे विभागाने पत्र जारी करीत पेंच व कन्हान नदीच्या काठाने राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
मध्यप्रदेशमध्ये सुरूअसलेल्या मुसळधार पावसामुळे चौराई धरणातील सहा गेट उघडण्यात आले असून, त्यातून १४०० क्युसेक पाणी सोडले जात आहे. त्यामुळे गेल्या २४ तासात १३ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा तोतलाडोह धरणात वाढला आहे. तसेच येत्या २४ तासात तोतलाडोह ९६ टक्के भरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशा परिस्थितीत तोतलाडोह ओव्हरफ्लो होण्याची दाट शक्यता आहे. वरिष्ठ अधिकारी पाण्याच्या पातळीवर लक्ष ठेवून आहेत.
तोतलाडोहची डेड स्टॉकसह एकूण पाणीसाठा क्षमता ११६६.९३ दलघमी इतकी आहे. ९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत ९३४.९८ दलघमी पाणी धरणात जमा झाले होते. चौराई धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने यात सायंकाळपर्यंत आणखी वाढ होत आहे. तोतलाडोह धरण ६५ टक्के भरताच नागपुरातील पाण्याचे संकट दूर झाले होते. परंतु आता धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर पोहोचले आहे.
महिनाभरातच भरले धरण
९ ऑगस्टपर्यंत तोतलाडोह धरणातील पाणीसाठा ० टक्के इतका होता.त्यामुळे ऐन पावसाळ्यात शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. पाणी वाचवण्याच्या उद्देशाने शहरात एक दिवसाआड पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. यानंतर चौराई धरणातील पाणीसाठा सातत्याने वाढू लागला. त्यामुळे ते धरण हाऊसफुल्ल झाल्याने त्यातील पाणी सोडण्याची वेळ आली. परिणामी तोतलाडोह जलाशयात पाणी जमा होऊ लागले. १० ऑगस्ट रोजी येथील पाणीसाठा ०.५८ टक्के इतका झाला. चौराई धरणातून १५ ऑगस्टपासून सातत्याने पाणी सोडले जात असल्याने ९ सप्टेंबरपर्यंत तोतलाडोह ८६.३७ टक्क्यांवर पोहोचला. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत तोतलाडोहमध्ये ४५ टक्के इतका पाणीसाठा होता. तोतलाडोह भरल्यामुळे एकीकडे शहरातील नागरिकांना आनंद झाला आहे, तर दुसरीकडे सिंचनासाठी पाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यांनाही आनंद झाला आहे.
पेंच व कन्हान नदीकाठच्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा
तोतलाडोह धरण ८६ टक्क्यांपेक्षा जास्त भरल्यामुळे येत्या एक किंवा दोन दिवसात धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जलशयातून विसर्ग नदीत सोडण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने पेंच व कन्हान नदीकाठच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत असून, लोकांनी आवश्यक सावधगिरी बाळगावी व शासनाकडून मिळत असलेल्या सूचनांवर लक्ष ठेवून त्याचे पालन करावे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अश्विन मुदगल यांनी सांगितले आहे. गावातील नागरिकांसाठी १०७७ किंवा ०७१२-२५६२६६८ या आपात्कालीन टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असेही सांगितले आहे.

Web Title: Totladoh in the direction of 'overflow':87.36% filled dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.