शेतकरी संघटनेचे आज ठिय्या आंदोलन
By Admin | Updated: November 30, 2014 00:52 IST2014-11-30T00:52:55+5:302014-11-30T00:52:55+5:30
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी रविवारी ३० नोव्हेंबर रोजी शेतकरी संघटनेतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठेतील त्रिकोणी पार्क येथील निवास स्थानापुढे ठिय्या

शेतकरी संघटनेचे आज ठिय्या आंदोलन
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
नागपूर: शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी रविवारी ३० नोव्हेंबर रोजी शेतकरी संघटनेतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठेतील त्रिकोणी पार्क येथील निवास स्थानापुढे ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, वीज देयकात माफी आणि शेतकऱ्यांसाठी ‘मार्शल प्लॅन’ आदी मागण्या शेतकरी संघटनेच्या आहेत. शुक्रवारी यासंदर्भात नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद जोशी यांच्यात रामगिरीवर चर्चा झाली होती. पण त्यातून तोडगा निघाला नाही. त्यामुळे रविवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापुढे शेतकरी ठिय्या आंदोलन करतील, असे प्रवक्ते राम नेवले यांनी सांगितले. या आंदोलनासाठी राज्यभरातून शेतकरी येणे सुरू झाले आहेत. रविवारी दुपारी १२ वा. शेतकरी संघटनेच्या गिरीपेठ येथील कार्यालयातून शेतकरी मोर्चाने निघतील. आर.टी.ओ. आॅफिस, धरमपेठमार्गे हा मोर्चा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धडकेल व तेथे ठिय्या देतील. दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
पोलिसांनी परवानगी नाकारली
ठिय्या आंदोलन, मोर्चा आणि ध्वनिक्षेपकासाठी पोलिसांकडे रीतसर परवानगी मागण्यात आली होती. पण ती नाकारण्यात आली आहे, असे नवले यांनी सांगितले. सरकारच्या दडपशाहीचा संघटनेने निषेध केला आहे. परवानगी नाकारली तरी आम्ही शेतकऱ्यांच्या हक्काच्या मागण्यासाठी आंदोलन करणारच, असा निर्धार शेतकरी संघटनेतर्फे व्यक्त करण्यात आला आहे.