नागपुरात तंबाखू व खर्रा बंदी; १५ ऑगस्टपासून अंमलबजावणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 07:00 IST2020-08-17T07:00:00+5:302020-08-17T07:00:16+5:30
नागपूर शहरात सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुगंधित सुपारी, खर्रा, पान खाण्याचा व खाऊन थुंकण्यास तसेच याची निर्मिती, साठवण, वितरण व विक्रीला प्रतिबंध घालण्यात आला आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबतचे आदेश १५ ऑगस्ट रोजी जारी केले आहेत.

नागपुरात तंबाखू व खर्रा बंदी; १५ ऑगस्टपासून अंमलबजावणी सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरात सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुगंधित सुपारी, खर्रा, पान खाण्याचा व खाऊन थुंकण्यास तसेच याची निर्मिती, साठवण, वितरण व विक्रीला प्रतिबंध घालण्यात आला आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबतचे आदेश १५ ऑगस्ट रोजी जारी केले आहेत.
सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, खर्रा, गुटखा खाऊन थुंकणाऱ्यास एक हजार तर निर्मिती, वितरण व विक्री करणाऱ्यास पाच हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. महाराष्ट्र शासनाने कोरोना विषाणूने उद्भवणाऱ्या संसर्गजन्य रोगांचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र कोविड-१९ उपाययोजना नियम २०२० यातील नियम ३ नुसार शहरी भागात आयुक्त महापालिका यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे अधिकार आहेत. त्यानुसार आयुक्तांनी आदेश जारी केले आहेत.
सार्वजनिक ठिकाणी खर्रा खाऊन थुंकल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
तंबाखू, खर्रा, सुगंधित सुपारी, गुटखा पान मसाला, मावा व तत्सम पदार्थांची निर्मिती साठवण व विक्री करणाऱ्यास पाच हजार रुपये दंड आकारला जाईल.
यांना आहेत कारवाईचे अधिकार
तंबाखू, खर्रा, सुगंधित सुपारी, गुटखा पान मसाला, मावा व तत्सम पदार्थ खाऊन थुंकणे व विक्री करणऱ्यावर कारवाई करण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. मनपाचे उपद्रव शोध व निर्मूलन पथक, स्वच्छता निरीक्षक, मुख्य स्वच्छता अधिकारी संबंधित झोनचे सहायक आयुक्त, पोलीस उपनिरीक्षक अधिकाऱ्यांना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.