लाेकमत न्यूज नेटवर्क
वाडी : आईने गाेळा करून ठेवलेले सरपण आणण्यासाठी मावसभावाला साेबत घेऊन जात असलेल्या विद्यार्थ्याच्या सायकलला मागून वेगात आलेल्या टिप्परने जाेरात धडक दिली. यात विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर त्याचा मावसभाऊ गंभीर जखमी झाला. शिवाय, त्याच्या सायकलचे अक्षरश: तुकडे झाले. ही घटना गिट्टीखदान पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील वाडी-दाभा मार्गावर मंगळवारी (दि. २९) सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.
खिलन महादेव गायनेर (१४, रा. टेकडी वाडी) असे मृत तर ओम अनिल वाघ (१०, रा. पारडसिंगा, ता. काटाेल) असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. खिलनच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आई कामाला जाते. तिने आदल्या दिवशी वाडी-दाभा राेडलगत सरपण गाेळा करून ठेवले हाेते. ते आणण्यासाठी खिलन त्याच्या मावसभावाला घेऊन सायकलने जात हाेता. दरम्यान, मागून वेगात आलेल्या एमएच-४०/एन-७८८६ क्रमांकाच्या टिप्परने त्याच्या सायकलला जाेरात धडक दिली. या धडकेमुळे त्याच्या सायकलचे अक्षरश: तुकडे झाले. शिवाय, दाेघांनाही गंभीर दुखापत झाली.
परिसरातील नागरिकांनी दाेघांनाही लगेच वाडी येथील हाॅस्पिटलमध्ये आणले. तिथे डाॅक्टरांनी खिलनला मृत घाेषित केले तर ओमवर प्रथमाेपचार केले. त्यानंतर त्याला नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. अपघात हाेताच टिप्परचालक पळून गेला. याप्रकरणी गिट्टीखदान (नागपूर) पाेलिसांनी टिप्परचालकाविरुद्ध भादंवि २७९ ३३८, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे टेकडी वाडी परिसरात शाेककळा पसरली हाेती.
...
एकुलता एक मुलगा
खिलन हा त्याच्या आईवडिलांना एकुलता एक मुलगा हाेता. त्याचा जन्म लग्नानंतर १० वर्षांनी झाल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली. ताे टेकडी वाडी येथील प्रबाेधनकार ठाकरे विद्यालयामध्ये इयत्त नववीत शिकायचा. त्याचे आईवडील मजुरी करून उदरनिर्वाह करतात. सध्या शाळा बंद असल्याने ताे आईवडिलांना मदत करायचा. ओम त्याचा मावसभाऊ असून, ताेदेखील शाळा बंद असल्याने पाहुणा म्हणून माेठ्या आईकडे आला हाेता.
...
रेतीची वाहतूक धाेकादायक
खिलनच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या टिप्परमध्ये रेती हाेती, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. बहुतांश वाहनांमधील रेती ही ओव्हरलाेड व विना राॅयल्टी किंवा राॅयल्टीपेक्षा अधिक असते. टाेलनाका व दंडात्मक कारवाई वाचविण्यासाठी रेतीची वाहने आडमार्गाने सुसाट धावतात आणि अपघातांना कारणीभूत ठरतात. या वाहतुकीचा कायम बंदाेबस्त करण्याची मागणी स्थानिक आमदार व सहायक पाेलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. मात्र, त्याची कुणीही दखल घेतली नाही.