बोअरवेलचा पंप ठरला चिमुकल्यासाठी काळ

By Admin | Updated: November 9, 2016 03:02 IST2016-11-09T03:02:01+5:302016-11-09T03:02:01+5:30

बोअरवेलची मशीन बाहेर काढताना लोखंडी साखळी तुटून त्याचा हूक मानेत फसल्यामुळे एका चिमुकल्याचा करुण अंत झाला.

The time for pinching the borewell pump | बोअरवेलचा पंप ठरला चिमुकल्यासाठी काळ

बोअरवेलचा पंप ठरला चिमुकल्यासाठी काळ

वाहनांची तोडफोड, तणाव : सोसायटी सचिवासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
नागपूर : बोअरवेलची मशीन बाहेर काढताना लोखंडी साखळी तुटून त्याचा हूक मानेत फसल्यामुळे एका चिमुकल्याचा करुण अंत झाला. सय्यद अरमान ऊर्फ अलफेस अली आबिद अली (वय ४ वर्षे) असे मृत बालकाचे नाव आहे. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाईक रोड परिसरात मंगळवारी दुपारी २.३० वाजता ही दुर्घटना घडली. त्यानंतर संतप्त झालेल्या जमावाने वाहनांची तोडफोड करून रोष व्यक्त केला. यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, या अपघाताला कारणीभूत असलेल्या सोसायटी सचिवासह तिघांविरुद्ध कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

महालमधील नाईक रोड भागात सुधाकरराव निंबाळकर यांच्या घराजवळ आबिद अली यांचे कुटुंबीय राहतात. आबिद यांना अरमान (वय ४) आणि रुमान ( वय ६) ही दोन मुले आहेत.
या ठिकाणी बालाजी रेसिडेन्सी ही बहुमजली इमारत आहे. तेथील बोअरवेलची मशीन नादुरुस्त झाल्यामुळे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी ती दुरुस्त करण्याचे काम एका कंत्राटदाराला दिले होते.
कंत्राटदाराने मजुरांकरवी दुपारी बोअरवेल दुरुस्तीचे काम सुरू केले. दुपारी २.३० च्या सुमारास लोखंडी हूक असलेली साखळी ट्रॅक्टरला (एमएच ४०/ एएच ०२२६) बोअरवेल सबमर्सिबल पंप बांधून वर ओढण्याचे (बाहेर काढण्याचे) काम सुरू होते.

यावेळी चिमुकला अरमान आणि रुमान शेजारच्या मुलांसोबत बाजूला खेळत होते. अचानक ट्रॅक्टरने ओढली जाणारी साखळी तुटली आणि उसळलेल्या साखळीचा हूक अरमानच्या मानेत (कॉलर बोन) फसला. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे रुमानसह त्याचे सवंगडी आरडाओरड करू लागले. त्यामुळे अल्पावधीतच बघ्यांची मोठी गर्दी जमली. अपघाताचे विदारक दृश्य पाहून नागरिकांमध्ये थरार निर्माण झाला. जखमी अरमानला प्रारंभी बाजूच्या डॉक्टरकडे आणि नंतर मेयोत नेण्यात आले. मेयोतील डॉक्टरांनी अरमानला मृत घोषित केले.

रुमानला जबर मानसिक धक्का
चुणचुणीत अरमान कुणासोबतही सहज गप्पा करीत होता. त्यामुळे तो या भागात अनेकांचा लाडका होता. अरमानच्या मृत्यूमुळे परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे. डोळ्यादेखत लहान भावाचा मृत्यू झाल्यामुळे रुमानला जबर मानसिक धक्का बसला आहे.

तोडफोड, प्रचंड तणाव
या घटनेमुळे अरमानच्या कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का बसला. अरमानचे वडील आबिद अली एका खासगी फायनान्स कंपनीत काम करतात. परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. संतप्त जमावाने परिसरातील वाहनांची तोडफोड केली. ते पाहून काम घेणारा कंत्राट आणि मजूर पळून गेले. माहिती कळताच कोतवालीचा पोलीस ताफा तेथे पोहचला. त्यांनी जमावाला कसेबसे शांत केले. अरमानच्या वडिलांकडून पोलिसांनी तक्रार लिहून घेतली. चिमुकल्या अरमानच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या तिघांविरुद्ध कोतवालीचे पोलीस उपनिरीक्षक एस. ए. दराडे यांनी मंगळवारी रात्री गुन्हा दाखल केला. त्यात बालाजी रेसिडेन्सी सोसायटीचे सचिव निरंजन गोपीलाल सूरजन, ट्रॅक्टर मालक कृष्णा शंकरराव परतेकी आणि चालक राजकुमार दादाजी टेंभरे या तिघांवर गुन्हे दाखल केले. प्राथमिक चौकशीतून या तिघांवर गुन्हे दाखल केले. आरोपींच्या संख्येत वाढ होऊ शकते, असे कोतवाली पोलिसांनी सांगितले.

Web Title: The time for pinching the borewell pump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.