मुलीला सासरी सोडण्यासाठी निघालेल्या महिलेवर काळाची झडप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:08 IST2021-05-25T04:08:09+5:302021-05-25T04:08:09+5:30
नागपूर : मुलीला सासरी सोडण्यासाठी निघालेल्या महिलेवर काळाने झडप घातली. भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे कारमधील बेबीताई पंचम दडमल ...

मुलीला सासरी सोडण्यासाठी निघालेल्या महिलेवर काळाची झडप
नागपूर : मुलीला सासरी सोडण्यासाठी निघालेल्या महिलेवर काळाने झडप घातली. भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे कारमधील बेबीताई पंचम दडमल (वय ६०) या महिलेचा करुण अंत झाला. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री हा अपघात घडला. बेबीताई यांच्या मुलीचे सासर पांढुर्णा येथे आहे. लॉकडाऊनमुळे मुलगी माहेरी अडकून पडली होती. तिला तिच्या सासरी सोडण्यासाठी बेबीताई, तिचा पुतण्या अमित गणेश दडमल (पारशिवनी) आणि परिवारातील काही सदस्य नागपूरमार्गे पांढुर्ण्याकडे निघाले. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबलपूर हैदराबाद हायवेवर रविवारी रात्री ७.४५ च्या सुमारास भरधाव ट्रक (टीएन ९३/ ए ५५०८) च्या चालकाने अमितच्या कारला जोरदार धडक दिली. त्यामुळे कारमधील बेबीताई दडमल यांचा मृत्यू झाला, तर इतर जबर जखमी झाले. मिळालेल्या माहितीवरून वाठोडा पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमीचे बयान नोंदवले. अमितच्या तक्रारीवरून आरोपी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे.
---