रेशनकार्ड नसलेल्या ४ हजार कुटुंबांवर उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:08 IST2021-05-23T04:08:14+5:302021-05-23T04:08:14+5:30
ब्रिजेश तिवारी कोंढाळी : काटोल व नरखेड तालुक्यांतील जवळपास ४ हजार कुटुंबांकडे रेशनकार्ड नाही. गेल्या लॉकडाऊनमध्ये सरकारने १० किलो ...

रेशनकार्ड नसलेल्या ४ हजार कुटुंबांवर उपासमारीची वेळ
ब्रिजेश तिवारी
कोंढाळी : काटोल व नरखेड तालुक्यांतील जवळपास ४ हजार कुटुंबांकडे रेशनकार्ड नाही. गेल्या लॉकडाऊनमध्ये सरकारने १० किलो गहू, १० किलो तांदूळ व जीवनावश्यक वस्तू असलेल्या किटचे रेशनकार्ड नसलेल्या गरीब लोकांना वाटप केले होते; पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्य सरकारने लावलेल्या प्रतिबंधामुळे रेशनकार्ड नसलेल्या गरीब लोकांवर उपासमारीची पाळी आली आहे. रेशनकार्ड नसलेल्या गरीब लोकांना तातडीने मदत करण्याची गरज आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळविण्यासाठी गत दीड महिन्यांपासून राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या काळात बॅण्ड पार्टी, बांधकाम क्षेत्रात काम करणारे मजूर, चहा पानटपरी चालवून पोट भरणाऱ्यांवर बिकट परिस्थिती ओढवली आहे. राज्य सरकार रेशनकार्डावर तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ मोफत देत आहे. केंद्र सरकारने दोन महिन्यांचे धान्य देण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार रेशनकार्डावर धान्याचे वितरण सुरू आहे.
कोंढाळी भागात तर रेशनिंगच्या धान्याचा रेशन दुकानदारांकडून मोठा काळाबाजार सुरू आहे. ग्रामीण भागात लॉकडाऊनने गरीब लोकांचे हाल होत आहेत; पण सध्या कुठल्याही निवडणुका नसल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गरीब लोकांना मदत करण्यासाठी व त्यांच्या समस्यांची दखल घेण्यास लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते तयार नाहीत. काटोल-नरखेड तालुक्यांत आजही अनेक मोलमजुरी करणाऱ्या लोकांकडे रेशनकार्ड नाही, हे वास्तव आहे. गेल्या लॉकडाऊनमध्ये शासनाने रेशनकार्ड नसलेल्या काटोल तालुक्यात २४०० तर नरखेड तालुक्यात १५०० कुटुंबीयांना प्रति माणूस १० किलो गहू, १० किलो तांदूळ तसेच प्रत्येक कुटुंबाला १ किलो साखर, १ किलो तेल, १ किलो डाळ, चहा पावडर आदी जीवनावश्यक वस्तू असलेल्या किटचे वितरण केल्याची माहिती काटोल-नरखेड तालुक्यांचे अन्नपुरवठा अधिकारी कमलेश कुंभरे यांनी दिली. हे किट दिल्यानंतर शासनाने वर्षभरात या रेशनकार्ड नसलेल्या कुटुंबीयांना एक किलोही धान्य दिले नाही.