तिळा तिळा दार उघड !
By Admin | Updated: May 16, 2014 00:40 IST2014-05-16T00:40:17+5:302014-05-16T00:40:17+5:30
नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी निवडणुकीत कुणाच्या बाजूने कौल दिला यासाठी तब्बल सव्वा महिन्यापासूनची प्रदीर्घ प्रतीक्षा उद्या, शुक्रवारी संपणार आहे.

तिळा तिळा दार उघड !
आज होणार फैसला - सर्वांचाच विजयाचा दावा नागपूर: नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी निवडणुकीत कुणाच्या बाजूने कौल दिला यासाठी तब्बल सव्वा महिन्यापासूनची प्रदीर्घ प्रतीक्षा उद्या, शुक्रवारी संपणार आहे. सकाळी १0 वाजेपर्यंत निकालाचा पहिला कौल मिळण्याची शक्यता आहे. आपणच विजयी होऊ, असा दावा करीत उमेदवारांनी संसदेत जाण्यासाठी ‘तिळा तिळा दार उघड’ म्हणणे सुरू केले आहे. आता मतदार कुणासाठी संसदेचे दार उघडतात, हे प्रत्यक्ष मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. ‘नॅशनल फेस’ असलेले उमेदवार रिंगणात असल्याने या दोन्ही लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. एवढेच नव्हे तर वृत्तवाहिन्यांवरील एक्झिट पोलने देशभरात उभारलेल्या चित्रामुळे नागपूर व रामटेकमध्ये कोण ‘एक्झिट’ होईल, याबाबतची उत्सुकता मतदारांमध्ये वाढली आहे. कळमना मार्केट यार्डमध्ये सकाळी ८ वाजतापासून या दोन्ही मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात होईल. दोन्ही मतदारसंघातील मतमोजणीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून यासाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.मतमोजणीस्थळी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था असणार असून अधिकारी वगळता तेथे कुणालाही इलेक्ट्रॉनिक वस्तू (मोबाईल, लॅपटॉप, कॅमेरे) नेण्यास मनाई करण्यात आली आहे,असे जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी अभिषेक कृष्णा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले. १0 एप्रिल रोजी नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी मतदान झाले होते. संपूर्ण नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातून सर्वप्रथम म्हणजे ८ वाजता टपाल मतपत्रिकांची मोजणी केली जाईल. त्यासाठी दोन्ही मतदारसंघ मिळून एकूण चार टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. चार सहायक निवडणूक निर्णय अधिकार्याची तेथे नियुक्ती करण्यात आली आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत टपाल मतांची मोजणी पूर्ण होईल. त्यानंतर ईव्हीएममध्ये नोंदवण्यात आलेल्या मतांची मोजणी सुरू होईल. यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय २0 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघ मिळून १२0 व रामटेक मतदारसंघासाठी तेवढेच असे एकूण २४0 टेबलवर एकाच वेळी मतमोजणीला सुरुवात होईल. यासाठी एकूण १४५0 कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एका टेबलवर एकाच वेळी २0 मतदान यंत्रातील मतांजी मोजणी केली जाईल. रामटेक लोकसभा मतदारसंघात एकूण १८ तर नागपूर लोकसभा मतदारसंसघात एकूण १५ फेर्या होण्याची शक्यता आहे. रामटेकमध्ये कामठी विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राची संख्या सर्वाधिक म्हणजे ४५0 असल्याने तेथे २३ फेर्या होईल. तर नागपूरमध्ये उत्तर नागपूरमध्ये सर्वाधिक म्हणजे ३३१ मतदान केंद्र असल्याने तेथे १७ फेर्या होतील. पहिल्या फेरीला सरासरी ४५ मिनिट तर त्यानंतरच्या प्रत्येक फेरीला २0 ते ३0 मिनिट लागण्याची शक्यता आहे. पहिल्या फेरीचा निकाल स. १0 वाजता जाहीर केला जाईल. मतमोजणीची प्रक्रिया सर्वसाधारणपणे दुपारी ४ वाजेपर्यंत पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. निकाल जाहीर होण्यास सायं ५ किवा ६ वाजू शकतात, असे जिल्हाधिकार्यांनी स्पष्ट केले. विजयी मिरवणूक काढण्यास प्रशासनाने बंदी घातली नाही. त्यासाठी पोलिसांकडून पूर्वपरवानगी घेण्याची गरज आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.पत्रकार परिषदेला रामटेक लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी व अतिरिक्त जिल्हाधिकारी पंजाबराव वानखडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रदीप डांगे उपस्थित होते. (प्रतिनिधी)