Tigers in Mihan! Trap in camera | मिहानमध्ये वाघच! कॅमेऱ्यात झाला ट्रॅप 
मिहानमध्ये वाघच! कॅमेऱ्यात झाला ट्रॅप 

ठळक मुद्देमुळ अधिवास क्षेत्रात पाठविण्यावर विचारमंथन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मिहानच्या परिसरात वाघ असल्याच्या चर्चेला अखेर पुष्टी मिळाली आहे. वनविभागाने लावलेल्या कॅमेऱ्यामध्ये वाघ ट्रॅप झाला आहे. त्याला सुरक्षितपणे पकडून त्याच्या अधिवास क्षेत्रात सोडण्यावर आता वनविभागामध्ये विचारमंथन सुरू आहे. तसेच वाघापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी काय करावे, यासाठी उपाययोजनांचे फ लक आणि पोस्टरही वनविभागाने ठिकठिकाणी लावले आहेत.
रविवारी सकाळी वनविभागाने १५ ट्रॅप कॅमेरे लावले होते. त्यापैकी एका कॅमेऱ्यामध्ये रात्री १० वाजताच्या सुमारास वाघ दिसला. वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मिहान परिसर असलेल्या एका लहान तलावासोबतच त्याला जुळलेल्या नाल्यांमुळे हा परिसर वन्य प्राण्यांसाठी निवास केंद्र बनले आहे. या मागील परिसरात कान्होलीबारा आणि हिंगणा वनक्षेत्र लागून आहे. त्यामुळे या परिसरातून वन्यजीव या परिसरात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मिहान परिसरात भ्रमण करणारा वाघ आला कोठून याचा शोध घेण्यासाठी वनविभागाने समिती गठित केली आहे. त्याच्या अधिवासाची माहिती मिळताच त्याला संबंधित ठिकाणी सोडले जाऊ शकते. इन्फोसिस कंपनीचा मागील भाग निर्मनुष्य आहे. मागील अनेक वर्षापासून या परिसरात वावर नसल्याने झुडपी जंगल वाढले आहे.
या परिसरात वाघ असल्याचे स्पष्ट होताच येथील कंपन्यांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या जागृतीसाठी पोस्टर लावण्यात आले आहेत. तसेन मिहान प्रशासनाला सावधगिरी बाळगण्यासाठी वनविभगाने पत्रही दिले आहे. मिहान प्रशासनाकडून क्षेत्रातील कंपन्यांना आपल्या स्तरावर खबरदारी बाळगण्यासाठी पत्र देणार आहे.
दरम्यान, सोमवारी जिल्ह्याचे उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ल, मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते, एएसीएफ काळे, आरएफओ विजय गंगावने आदींनी दोन वेळा परिसराला भेट दिली. परिसराची पहाणी करून कंपनीच्या अधिकाऱ्यांशी आणि तैनात असलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांशी चर्चाही केली.

कॅमेऱ्यांमध्ये वाढ
या परिसरात वाघ असल्याची पुष्टी होताच त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाने कॅमेऱ्यांच्या संख्येत वाढ केली आहे. सोमवारी २५ कॅमेरे लावण्यात आले. वाघ दिसताच त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथकही तैनात करण्यात आले आहे.

Web Title: Tigers in Mihan! Trap in camera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.