मिहानच्या विजेसाठी निविदा
By Admin | Updated: July 1, 2014 01:06 IST2014-07-01T01:06:07+5:302014-07-01T01:06:07+5:30
गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या मिहान-सेझमधील विजेच्या प्रश्नावर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) तोडगा काढला आहे. एमएडीसी ‘ओपन अॅक्सेस’मधून वीज खरेदी

मिहानच्या विजेसाठी निविदा
ओपन अॅक्सेसमधून वीज घेणार : मुख्यमंत्र्यांची मंजुरी
नागपूर : गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या मिहान-सेझमधील विजेच्या प्रश्नावर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) तोडगा काढला आहे. एमएडीसी ‘ओपन अॅक्सेस’मधून वीज खरेदी करून उद्योगांना कमी दरात देणार आहे. राज्य वीज नियामक आयोगाच्या मंजुरीनंतर वीज पुरवठ्याची लघु निविदा लवकरच काढण्यात येणार असल्याची माहिती आहे.
केंद्रीय परिवहन व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी रविभवनात अलीकडेच या संबंधीची बैठक घेतली होती. तर राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्या विनंतीनंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संबंधीची घोषणा केली होती. उद्योजकांनी जमीन खरेदी करताना केलेल्या करारानुसार उद्योगांसाठी प्रति युनिट २.९७ रुपये वीज मिळणार होती. पण एमएडीसीचे चुकीचे धोरण आणि अभिजित समूहाने तांत्रिक व धोरणात्मक अडचणी पुढे करून प्रकल्पातील उत्पादन आणि पुरवठा बंद केला. समूहाला कोळशाचे लिंकेज आणि विजेचे ४.५० रुपये प्रति युनिट दर हवे होते. समूहाच्या वाढीव वीजदराच्या मागणीकडे दुर्लक्ष करून एमएडीसीने महावितरणची ९ ते १० रुपये युनिट दराची वीज खरेदी करून उद्योगांना देण्यास मंजुरी दिली. या निर्णयामुळे उद्योजकांमध्ये खळबळ उडाली. येथील उद्योजकांची संघटना मिहान इंडस्ट्रीज असोसिएशनने वीज नियामक आयोग आणि हायकोर्टात धाव घेतली. हा प्रश्न एमएडीसीने सोडवावा, असे निर्देश देण्यात आले. त्यानंतरही एमएडीसीला हा प्रश्न सोडविण्यात अपयश आले. मिहानमधील अडचणी सोडविण्यासाठी गडकरी यांनी पुढाकार घेतल्याने हा प्रश्न मार्गी लागण्याची उद्योजकांमध्ये चर्चा आहे. मिहानच्या विकासातील मोठा अडथळा यामुळे दूर होणार आहे. नवीन उद्योगांची स्थापना व अस्तित्वातील उद्योगांच्या विस्तारीकरणासाठी ओपन अॅक्सेसची वीज तातडीने मिळावी, अशी मागणी उद्योजकांनी लोकमतशी बोलताना केली. (प्रतिनिधी)