वाघाने केली गाेऱ्ह्याची शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:15 IST2021-03-13T04:15:26+5:302021-03-13T04:15:26+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क मेंढला : वाघाने शेतातील गाेठ्यात बांधलेल्या जनावरांवर हल्ला चढवीत त्यातील एका गाेऱ्ह्याची शिकार केली. ही घटना ...

वाघाने केली गाेऱ्ह्याची शिकार
लाेकमत न्यूज नेटवर्क
मेंढला : वाघाने शेतातील गाेठ्यात बांधलेल्या जनावरांवर हल्ला चढवीत त्यातील एका गाेऱ्ह्याची शिकार केली. ही घटना मेंढला (ता. नरखेड) नजीकच्या वाढाेणा शिवारात गुरुवारी (दि. ११) मध्यरात्री घडली असून, शुक्रवारी (दि. १२) सकाळी उघडकीस आली. यात २५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्याने दिली.
वाढाेणा (ता. नरखेड) शिवारात जंगलालगत पाझर तलाव असून, या तलावाच्या परिसरात गजानन कनिरे, रा. मेंढला यांची शेती आहे. त्यांनी फार पूर्वीच शेतात गाेठ्याचे बांधकाम केले असून, त्यांची सर्व जनावरे त्या गाेठ्यातच बांधली असायची. गुरुवारी सायंकाळी गजानन कनिरे यांनी त्या गाेठ्यात बैलजाेडी, दाेन गाई, गाेऱ्ह्या व वासरे बांधली आणि घराकडे आले. त्यांचा मुलगा मनाेज कनिरे शुक्रवारी सकाळी शेतात गेला असता, त्याला गाेठ्यातील गाेऱ्ह्याची शिकार केल्याचे तसेच अन्य जनावरे सुरक्षित असल्याचे आढळून आले. शेतात वाघाच्या पाऊलखुणाही आढळून आल्या आहेत.
त्या गाेऱ्ह्याची किंमत २५ हजार रुपये असल्याची माहिती मनाेज कनिरे यांनी दिली. हा भाग जंगली असला तरी पूर्वी या परिसरात हिंस्र व इतर वन्यप्राण्यांचा वावर अथवा वास्तव्य नव्हते. अलीकडच्या काळात राेही, रानडुक्कर व बिबट्याचा वावर वाढल्याने हे वन्यप्राणी पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान करीत असून, गुरांची शिकार करीत आहेत. त्यामुळे वन विभागाने या प्राण्यांचा बंदाेबस्त करावा तसेच या गाेऱ्ह्याची याेग्य ती नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी गजानन कनिरे यांच्यासह मेंढला व वाढाेणा येथील शेतकऱ्यांनी केली आहे.