‘टायगर हिल’ने दिली लढण्याची जिद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 23:38 IST2018-07-25T23:36:22+5:302018-07-25T23:38:09+5:30
उंचावर बसलेला शत्रू, प्रतिकूल हवामान, साधनसामुग्री पोहोचण्यात येणारी अडचण अन् डोळ्यासमोर शहीद होणारे सहकारी जवान व अधिकारी. सर्व बाबी विरोधात असतानादेखील भारतीय जवानांचे संकल्प अढळ होता. तोफगोळ्यांच्या माऱ्यामुळे अक्षरश: लाल झालेली ‘टायगर हिल’नेच सर्व जवानांना लढण्याची जिद्द दिली व याच बळावर देशाने भगिरथ यश खेचून आणले. ही भावना आहे कारगीलच्या युद्धात प्रत्यक्षपणे सहभागी झालेल्या व सध्या नागपुरात एका खासगी संस्थेत कार्यरत असलेल्या एका जवानाची.

‘टायगर हिल’ने दिली लढण्याची जिद्द
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उंचावर बसलेला शत्रू, प्रतिकूल हवामान, साधनसामुग्री पोहोचण्यात येणारी अडचण अन् डोळ्यासमोर शहीद होणारे सहकारी जवान व अधिकारी. सर्व बाबी विरोधात असतानादेखील भारतीय जवानांचे संकल्प अढळ होता. तोफगोळ्यांच्या माऱ्यामुळे अक्षरश: लाल झालेली ‘टायगर हिल’नेच सर्व जवानांना लढण्याची जिद्द दिली व याच बळावर देशाने भगिरथ यश खेचून आणले. ही भावना आहे कारगीलच्या युद्धात प्रत्यक्षपणे सहभागी झालेल्या व सध्या नागपुरात एका खासगी संस्थेत कार्यरत असलेल्या एका जवानाची. कारगील विजय दिवसानिमित्त रोमांचक आठवणींना उजाळा देत असताना त्यांच्या चेहºयावरील उत्साह व डोळ्यातील भावनाच सर्वकाही सांगून जात होत्या. सैन्याच्या नियमांप्रमाणे नाव समोर येऊ नये या अटीवर त्यांनी प्रत्यक्ष युद्धामधील अनुभवांचे कथन केले.
युद्धाच्या अखेरच्या क्षणात आमचे लक्ष्य ‘टायगर हिल’ हेच होते. तोफगोळ्यांचा ‘टायगर हिल’वर मारा करण्यात येत होता व वायुसेनेच्या विमानांनीदेखील आकाशातून मारा सुरू केला. त्यावेळी ‘टायगर हिल’ तोफगोळ्यांच्या माºयांमुळे अक्षरश: लाल झाल्यासारखी भासत होती. ज्या वेळी विजय मिळाला त्यावेळी सर्वांनाच आयुष्यभर पुरेल इतके समाधान लाभले होते. तो थरार, रोमांच मी अनुभवला आहे याचा मला सार्थ अभिमान आहे, अशी आठवण संबंधित जवानाने सांगितली.
तोफखाना पथकाने दिला आधार
कारगील युद्धाला सुरुवात झाल्यानंतर नेमका शत्रू कुठे आहे, याचा अंदाज येत नव्हता. वातावरणदेखील प्रतिकूल झाले होते. ‘स्नो-फॉल’मुळे कडाक्याची थंडी होती अन् मोजकेच कपडे असल्यामुळे वर चढण्यास अडचणी येत होत्या. आधार होता ते तोफखान्याच्या पथकाचा. त्यांच्याकडून शत्रूवर मारा सुरू होता व त्याच्या ‘कव्हर’मध्ये आम्ही वर चढण्याचा प्रयत्न करत होतो. कारगील युद्धाच्या सुरुवातीला आम्हाला संदेश आला की लाडू आणि बर्फीचे ट्रक येत आहेत. सुरुवातीला नेमके काय होत आहे कळालेच नाही. परंतु ज्यावेळी ट्रक प्रत्यक्षात आले तेव्हा त्यात तोफखान्याला लागणारा दारूगोळा होता.
देशाचे भरभरून प्रेम मिळाले
सीमेवर लढणाºया जवानांबाबत सामान्यांना काहीही घेणे-देणे नसते, अशी ओरड असते. मात्र आम्हाला आजपर्यंत असा कधीही अनुभव आला नाही. कारगील युद्धात आम्हाला सुरुवातीला जेवणाची अडचण गेली होती, मात्र नंतर देशभरातून मदत आली. डोळ्यासमोर सहकारी शहीद होत असतानादेखील नागरिकांच्या प्रेमातूनच आत्मविश्वास कायम राहिला, असे त्यांनी सांगितले.