वाघाचा हल्ला, बिबट्याची झडप, भटक्या कुत्र्यांचा चावा विधानसभेत गाजला; मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांची उपाययोजनेसाठी बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 05:25 IST2025-12-10T05:24:24+5:302025-12-10T05:25:52+5:30
विधानसभेत आ. जितेंद्र आव्हाड, अतुल भातखळकर, जयंत पाटील, सुनील प्रभू, काशिनाथ दाते, कृष्णा खोपडे आदी आमदारांनी लक्षवेधी सूचना मांडत राज्यात वाघ, बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असल्याकडे वनमंत्र्यांचे लक्ष वेधले.

वाघाचा हल्ला, बिबट्याची झडप, भटक्या कुत्र्यांचा चावा विधानसभेत गाजला; मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांची उपाययोजनेसाठी बैठक
नागपूर : राज्यात वाघ व बिबटे मानवी वस्तीत शिरण्याच्या घटना वाढल्या असून त्यांच्या हल्ल्यात अनेकांचे जीव जात आहेत. तर भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून नागरिकांना वस्त्यांमध्ये फिरणे कठीण झाले आहे. मंगळवारी विधानसभेत हा मुद्दा चांगलाच गाजला. सर्वपक्षीय आमदारांनी याकडे शासनाचे लक्ष वेधत उपाय योजण्याची मागणी लावून धरली. शेवटी या संवेदनशील विषयावर ठोस उपाय योजण्यासाठी अधिवेशन काळात मंत्री, आमदार व अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचा निर्णय सरकारने घेतला.
बिबट्या आता वन्यजीव नव्हे, उसातील प्राणी
विधानसभेत आ. जितेंद्र आव्हाड, अतुल भातखळकर, जयंत पाटील, सुनील प्रभू, काशिनाथ दाते, कृष्णा खोपडे आदी आमदारांनी लक्षवेधी सूचना मांडत राज्यात वाघ, बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असल्याकडे वनमंत्र्यांचे लक्ष वेधले.
या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक म्हणाले, बिबट्या आता नुसता वन्यजीव राहिला नाही, तर तो उसातील प्राणी झाला आहे. त्यामुळे शेड्युल १ मध्ये असलेल्या बिबट्याचा समावेश आता शेड्युल २ मध्ये करावा, असा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला आहे.
सन २०२३ ते नोव्हेंबर २०२५ दरम्यान राज्यात बिबट्याच्या हल्ल्यात एकूण ६७ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यापैकी ३१ जणांचा मृत्यू गेल्या ११ महिन्यांत झाला आहे.
जंगलात बकऱ्या सोडणार, फळझाडे लावणार
जंगलात शाकाहारी प्राण्यांना खाण्यासाठी फळे उरलेली नाही. त्यामुळे शाकाहारी प्राणी शहराकडे येतात व त्यांच्या शोधात वाघ, बिबट जंगलाबाहेर येतात. त्यामुळे जंगलाच्या कोअर भागात फळझाडे लावली जातील.
शाकाहारी प्राणी जंगलातच राहतील व बिबटे त्यांच्या शोधात बाहेर येणार नाहीत. वन्यप्राण्यांसाठी खाद्य म्हणून जंगलात बकऱ्या सोडल्या जातील, असे वनमंत्री नाईक यांनी सांगितले.
महसूलमंत्री बावनकुळे यांनी सहाही विभागातील लोकप्रतिनिधी, वनमंत्री व महसूलमंत्री याची विभागनिहाय बैठक घेऊन या प्रश्नावर उपाय योजण्यात येईल, असे आश्वस्त केले.
बऱ्याच शेतकऱ्यांकडे बंदूक परवाने होते. वन्यप्राण्यांपासून बचावासाठी या शस्त्रांचा उपयोग केला जायचा. मात्र, त्यांचे परवाने नूतनीकरण करण्यात आलेले नाहीत. रत्नागिरीहून अशी तक्रार आली असता तेथील जिल्ह्याधिकाऱ्यांना बंदूक परवाने नूतनीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यातील इतर भागांतही महसूलमंत्र्यांच्या माध्यमातून तशा सूचना दिल्या जातील, असेही वनमंत्री नाईक यांनी सांगितले.
आमदाराला कुत्रा चावला तर काय करायचे?
मुंबईत सुमारे एक लाखांच्या आसपास भटकी कुत्री आहेत. या कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. आता तर लोकप्रतिनिधींनाही वस्त्यांमध्ये फिरणे कठीण झाले आहे, असे सांगत या भटक्या कुत्र्यांना आवरा, अशी मागणी मुंबईतील सर्वपक्षीय आमदारांनी केली.
भाजपचे आ. अतुल भातखळकर यांनी मंगळवारी विधानसभेत लक्षवेधी मांडत मुंबईत भटक्या कुत्र्यांसाठी फक्त ८ निवारा केंद्र असल्याकडे सरकारचे लक्ष वेधले. तर, आमदाराला कुत्रा चावल्यास काय करायचे, असा सवाल आ. सुनील प्रभू यांनी केला.