वाघाचा हल्ला किरकोळ घटना नाही, जखमीला १ लाख रुपये भरपाई द्या, हायकोर्टाचे वन विभागाला आदेश
By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: May 28, 2023 18:47 IST2023-05-28T18:47:35+5:302023-05-28T18:47:56+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वाघाच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या महिलेला एक लाख रुपये भरपाई अदा करण्याचा आदेश वन विभागाला दिला.

वाघाचा हल्ला किरकोळ घटना नाही, जखमीला १ लाख रुपये भरपाई द्या, हायकोर्टाचे वन विभागाला आदेश
नागपूर : वाघाचा हल्ला ही किरकोळ घटना होऊच शकत नाही, असे स्पष्ट मत मुंबईउच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने व्यक्त करून वाघाच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या महिलेला एक लाख रुपये भरपाई अदा करण्याचा आदेश वन विभागाला दिला. हे प्रकरण चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. त्यावर न्यायमूर्तिद्वय रोहित देव व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
कविता वामन कोकोडे (३७) असे जखमी महिलेचे नाव असून ती वाकल, ता. सिंदेवाही येथील रहिवासी आहेत. कविता व्यवसायाने मजूर आहे. ती अर्थार्जनासाठी शेतामध्ये मजुरी करीत होती. २४ जानेवारी २०१७ रोजी ती तूर कापण्यासाठी शेतात गेली होती. दरम्यान, पूर्णपणे वाढ झालेल्या वाघाने तिच्यावर हल्ला केला. आजूबाजूचे मजूर मदतीसाठी धावल्यामुळे वाघ जंगलात पळून गेला व ती बचावली. परंतु, तेव्हापर्यंत वाघाने तिला गंभीररित्या जखमी केले. परिणामी, ती बेशुद्ध पडली होती. चंद्रपूर येथील सरकारी रुग्णालयात चार दिवस उपचार केल्यानंतर तिची प्रकृती सुधारली, पण ती घरगुती व मजुरीचे काम करण्यास असक्षम झाली आहे.
कविताने २८ नोव्हेंबर २०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार वन विभागाला भरपाईकरिता अर्ज सादर केला होता. परंतु, वाघाच्या हल्ल्यामुळे किरकोळ जखमा झाल्याचा निष्कर्ष काढून तिला केवळ दहा हजार रुपये भरपाई मंजूर करण्यात आली. त्याविरुद्ध कविताने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने ती याचिका अंशत: मंजूर करून तिला एक लाख रुपये भरपाईसाठी पात्र ठरविले. कवितातर्फे ॲड. संदीप बहीरवार यांनी बाजू मांडली.
वन विभागाला फटकारले
वाघाचा हल्ला परतवून लावल्यामुळे कविताला राज्य सरकारने शौर्य प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले आहे. असे असताना वन विभागाने तिला केवळ दहा हजार रुपये भरपाई दिली. हा निर्णय धक्कादायक आहे, अशा शब्दांत न्यायालयाने वन विभागाला फटकारले. वाघाचा हल्ला साधारण घटना होऊच शकत नाही. वन विभागाने केवळ जखमा पाहिल्या, कविताला बसलेला मानसिक धक्का विचारात घेतला नाही, असेही न्यायालय म्हणाले.