Tickets on performance, not 'biodata' for assembly: Nadda, Gadkari indicates | विधानसभेसाठी 'बायोडाटा' नव्हे, कामगिरीवरच तिकीट : नड्डा, गडकरी यांचे संकेत

विधानसभेसाठी 'बायोडाटा' नव्हे, कामगिरीवरच तिकीट : नड्डा, गडकरी यांचे संकेत

ठळक मुद्देसंकल्प मेळाव्यातून फुंकले प्रचाराचे रणशिंग

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजपकडून तिकिटासाठी दावेदारांची मोठी यादी आहे. अनेक जण मोठ्या नेत्यांकडे आशीर्वाद घेण्यासाठी जात आहेत तर बरेच लोक ‘बायोडाटा’ सादर करत आहेत. मात्र पक्षाकडे सर्वांचीच कुंडली आहे. मागील पाच वर्षांतील कामगिरीच्या आधारावरच एखाद्याला तिकीट द्यायचे की नाकारायचे हे ठरविण्यात येईल, असे स्पष्ट संकेत भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी दिले. नागपुरात संकल्प मेळाव्यादरम्यान दोघाही राष्ट्रीय नेत्यांनी विदर्भातील भाजप नेते-पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
कविवर्य सुरेश भट सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला राज्याचे भाजपाचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही.सतीश, राज्य प्रभारी सरोज पांडे, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषिमंत्री अनिल बोंडे, आदिवासी विकासमंत्री अशोक उईके, गृहराज्यमंत्री डॉ.रणजित पाटील, ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार, विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष आ.चैनसुख संचेती, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर, माजी खासदार दत्ता मेघे व अजय संचेती, महापौर नंदा जिचकार, शहराध्यक्ष प्रवीण दटके, जिल्हाध्यक्ष डॉ.राजीव पोतदार यांच्यासह विदर्भातील आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. भाजपाकडे आजच्या तारखेत नेतादेखील आहे आणि योग्य नीतीदेखील आहे. पक्षाकडून काही तरी मिळालेच पाहिजे ही अपेक्षा न बाळगता कार्यकर्त्यांनी विचारधारेवर कायम राहून काम केले पाहिजे. निवडणुकांच्या काळात दावेदारांकडे दोनच डोळे असतात, मात्र त्यांना हजारो डोळे पाहत असतात. त्यामुळे सर्वांनी पक्षाला आपले समजून काम केले पाहिजे. प्रत्येक नेत्याला आपल्या अंतर्गत येणाºया किमान पाच ‘बूथ’ची इत्थंभूत माहिती पाहिजे. जर नेता व्हायचे असेल तर ‘बूथ’वरदेखील काम केलेच पाहिजे व तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजे, असे प्रतिपादन जे.पी.नड्डा यांनी केले.
५४ दिवसात वाढले ६ कोटी सदस्य
भाजपाच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या ११ कोटी होती. पक्षाने देशभरात सदस्यता मोहीम सुरु केली व ५४ दिवसात ही संख्या १७ कोटींवर गेली आहे, अशी माहिती जे.पी.नड्डा यांनी दिली. डावे पक्ष व भाजप हे दोनच पक्ष विचारसरणीवर चालत आहेत. इतर सर्व पक्षांमध्ये घराणेशाहीच सुरू असल्याचे प्रतिपादन करत त्यांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसवर अप्रत्यक्षपणे टीका केली. कलम ३७० च्या आडून जम्मू-काश्मीरला देशापासून तोडण्याचा प्रयत्न सुरू होता व कॉंग्रेसचे नेतेदेखील यात सहभागी होते, असा आरोपदेखील त्यांनी लावला.
गडकरींना विश्वास, युती होणार
विधानसभेसाठी भाजप सेना युती होईल असे वाटते. भाजपला मागील वेळेपेक्षा राज्यात जास्त जागा मिळतील. विदर्भात १०० टक्के जागांवर विजय मिळेल व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात परत राज्यात सरकार बनेल, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. केवळ सत्ता मिळविणे हे भाजपचे ध्येय नाही. राष्ट्र, समाज बदलायचे आहे. लोकशाहीला जिवंत ठेवायचे आहे, असेदेखील ते म्हणाले.
भाजपमध्ये तिकीटवाटपासाठी कुठलाच ‘कोटा’ नाही
यावेळी नितीन गडकरी यांनी तिकीटवाटपादरम्यानच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा व नाराजी यावर भाष्य केले. आता कार्यकर्ते निवडणुकीच्या 'मोड'मध्ये असून तिकीट कुणाला मिळणार याची चर्चा दिसून येते. आशीर्वाद मागणाऱ्यांची संख्या वाढली आहे. कार्यकर्त्यांनी तिकिटाची अपेक्षा करणे यात काहीच गैर नाही. परंतु भाजपमध्ये तिकीट वाटपासाठी कुठलाही 'कोटा' नाही. कार्याचे मूल्यांकन होऊन तिकीट वाटप होईल. ज्याला तिकीट मिळेल त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहा, असे आवाहन गडकरी यांनी केले.
गडकरींनी टोचले नेत्यांचे कान
भाषणादरम्यान गडकरी यांनी आपल्या नातेवाईकांसाठी तिकीट मागणाऱ्या नेत्यांचे कानदेखील टोचले. काही खासदार, आमदार आपल्यामुळेच विजय मिळत असल्याच्या तोऱ्यात वावरतात. मात्र खरा विजय कार्यकर्त्यांमुळे होतो. विजयाचा अहंकार कुणीही करु नये. काही नेते मुलगा, पत्नीसाठी तिकीट मागतात. परंतु भाजपमध्ये अशी नातेवाईकांना थेट तिकीट मिळतच नाहीत. तसे नेत्याचा मुलगा किंवा नातेवाईक असणे गुन्हा नाही. मात्र अशी मागणी जनतेने केली तरच कुटुंबीयांना तिकीट देण्याबाबत विचार होऊ शकतो, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.

Web Title: Tickets on performance, not 'biodata' for assembly: Nadda, Gadkari indicates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.