सिताबर्डी उड्डाणपुलावर ‘बर्निंग कार’चा थरार
By योगेश पांडे | Updated: October 17, 2023 23:18 IST2023-10-17T23:18:44+5:302023-10-17T23:18:57+5:30
मंगळवारी रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान रहाटे कॉलनीकडून झीरो माईलकडे एमएच ०१ बीटी ८५०१ ही पांढऱ्या रंगाची कार चालली होती.

सिताबर्डी उड्डाणपुलावर ‘बर्निंग कार’चा थरार
नागपूर : प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका कारने आदिवासी गोवारी शहीद उड्डाणपुलावर अचानक पेट घेतला आणि काही वेळातच कार बेचिराख झाली. सुदैवाने आतील प्रवासी व चालक वेळेवर बाहेर पडल्याने कुणालाही इजा झाली नाही. या प्रकारामुळे उड्डाणपुलावर खळबळ उडाली.
मंगळवारी रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान रहाटे कॉलनीकडून झीरो माईलकडे एमएच ०१ बीटी ८५०१ ही पांढऱ्या रंगाची कार चालली होती. मोरभवन बसस्थानकासमोरील भागातून जात असताना अचानक कारमधून धूर येऊ लागला. प्रसंगावधान राखत चालकाने ब्रेक लावले व कारमधील सर्वजण खाली उतरले. काही वेळातच कारने पेट घेतला व कारला आगीने वेढले.
आजुबाजूने जाणारी वाहनेदेखील थांबली. या प्रकाराची माहिती तातडीने सिताबर्डी पोलीस ठाण्याला व अग्निशमन विभागाला देण्यात आली. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवली. त्यानंतर कारला सिताबर्डी पोलीस ठाण्यात नेण्यात आले.