तीन ‘शहाणे’ एकाच वॉर्डात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:18 IST2021-01-13T04:18:47+5:302021-01-13T04:18:47+5:30
सारख्या नावाचे दोघे, तर सारख्याच आडनावाचे चौघे ग्रा.पं.च्या आखाड्यात : काँग्रेसच्या गटबाजीचा फायदा कुणाला? जितेंद्र ढवळे/सुदाम राखडे कामठी ...

तीन ‘शहाणे’ एकाच वॉर्डात!
सारख्या नावाचे दोघे, तर सारख्याच आडनावाचे चौघे ग्रा.पं.च्या आखाड्यात : काँग्रेसच्या गटबाजीचा फायदा कुणाला?
जितेंद्र ढवळे/सुदाम राखडे
कामठी : शहाण्या (हुशार) व्यक्तीचा सारेच आदर करतात. गावगाड्यात शहाण्या आणि दीड शहाण्यातील खटके चर्चेतही राहतात! मात्र सध्या कामठी तालुक्यातील टेमसना ग्रा.पं.ची निवडणूक ‘शहाणे’ या नावाने चर्चेत आली आहे. कारणही तसेच आहे. येथे एकाच वॉर्डात सारख्या नाव आणि आडनावाचे दोघे तर सारख्या आडनावाच्या तीन उमेदवारांनी एकमेकाविरोधात दंड थोपाटले आहेत. यात भर म्हणून गावात आणखी याच आडनावाच्या उमेदवाराने निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. नावातील या साधर्म्यामुळे योग्य उमेदवाराची निवड करताना मतदाराचा मात्र १५ तारखेला निश्चितच कस लागणार आहे. येथील वॉर्ड क्रमांक ३ मध्ये भाजप समर्थित आदर्श ग्राम विकास आघाडीने अरविंद केशवराव शहाणे, तर शेतकरी पॅनेलने अरविंद केशवराव शहाणे यांना रिंगणात उतरविले. या दोन्ही सारख्या नावांच्या उमेदवारांना शह देण्यासाठी आणखी एका शहाणे आडनावाच्या उमेदवाराने दंड थोपटले आहेत. हे उमेदवार काँग्रेस समर्थित ग्रामविकास आघाडीचे अनिकेत पुरुषोत्तम शहाणे आहेत.
टेमसना ग्रा.पं.ची सत्ता काबीज करण्यासाठी गावातील तीन गटांनी कंबर कसली आहे. येथे ९ जागांसाठी २४ उमेदवार रिंगणात आहेत. जागा वाटपावरून एकमत न झाल्याने ऐनवेळी काँग्रेसचे दोन गट एकमेकाविरोधात उभे ठाकले आहेत. येथे कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व माजी सरपंच मनोहर कोरडे यांनी शेतकरी पॅनेल तयार करून वॉर्ड १ व ३ मध्ये उमेदवार उभे करीत स्वपक्षालाच आव्हान दिले आहे. या बिघाडीचा लाभ घेण्यासाठी भाजप समर्थित आदर्श ग्राम विकास आघाडीने तिन्ही वार्डांतून उमेदवार रिंगणात उतरविले आहेत.
येथे वॉर्ड क्रमांकमध्ये काँग्रेस समर्थित आघाडी कडून विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राहुल डोईफोडे यांच्या विरोधात भाजप समर्थित आदर्श ग्राम विकास आघाडीचे शाम तांबे, तर शेतकरी पॅनेलकडून मनीष डोईफोडे रिंगणात आहेत. सर्वसाधारण महिला राखीव जागेकरिता याच वॉडार्तून काँग्रेस समर्थित गटाकडून वनिता शहाणे यांना संधी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात आदर्श ग्राम विकास आघाडीच्या वर्षा आमधरे, तर शेतकरी पॅनेलकडून संगीता मोहोळ रिंगणात आहेत.
वॉर्ड क्रमांक १ मध्येही तिन्ही पॅनेलमध्ये लढत होताना दिसत आहे. वॉर्ड क्रमांक दोनमध्ये ग्राम विकास आघाडीने रामभाऊ हडसन, तर आदर्श ग्रामविकास आघाडीने सुरेश मारबते यांना रिंगणात उतरविले आहे. येथे अनुसूचित जाती महिलाकरिता राखीव असलेल्या जागेकरिता ग्राम विकास आघाडीकडून शीतल नितनवरे, तर आदर्श ग्राम विकास आघाडीकडून माला फाले यांच्यात लढत आहे. सर्वसाधारण महिला गटात ग्राम विकास आघाडीकडून वर्षा उचले यांच्या आदर्श ग्राम विकास आघाडीकडून अर्चना वेंकटकर मैदानात आहेत. या ग्रा.पं.साठी काँग्रेसचे पुरुषोत्तम शहाणे, जि. प. सदस्या अवंतिका लेकुरवाळे, तर भाजपकडून माजी तालुकाध्यक्ष रमेश चिकटे, किशोर बेले यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
अशी आहे ग्रा.पं.
टेमसना-परसोडी-कुसुंबी या गट ग्रामपंचायतमध्ये तीनही गावांत शेतकरी-शेतमजूर वास्तव्याला आहे. नागपूर शहरापासून १२ कि.मी. अंतरावर वसलेल्या या गावात व्यापारी व बिल्डर्सनी शेतजमिनी विकत घेत ले-आऊटच्या व्यवसायात उडी घेतली आहे.
एकूण वॉर्ड : ०३
एकूण सदस्य : ०९
एकूण उमेदवार : २४
एकूण मतदार : १४५६
पुरुष मतदार : ७२७
महिला मतदार : ७२९