विनयभंगाच्या खटल्यात साक्ष न देण्यासाठी जीवे मारण्याची धमकी, महिलेचा परत केला विनयभंग
By योगेश पांडे | Updated: April 5, 2024 15:20 IST2024-04-05T15:19:37+5:302024-04-05T15:20:28+5:30
लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

विनयभंगाच्या खटल्यात साक्ष न देण्यासाठी जीवे मारण्याची धमकी, महिलेचा परत केला विनयभंग
नागपूर : विनयभंगाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाल्यावर तो खटला न्यायालयात सुरू असतानादेखील एका आरोपीने तक्रारदार महिलेला धमकी देत परत विनयभंग केला. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
सर्फराज तनवीर शेख सत्तार (४०, लकडगंज) असे आरोपीचे नाव आहे. २०२३ साली त्याच्याविरोधात ३७ वर्षीय महिलेच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण न्यायालयात आहे. या प्रकरणात न्यायालयामध्ये महिलेने साक्ष देऊ नये यासाठी सर्फराज वारंवार दबाव आणत होता. २० ऑक्टोबर २०२३ पासून त्याने महिलेचा पाठलाग करणे सुरू केले. तो तिच्या घरासमोर येऊन अश्लिल इशारे करायचे.
इतकेच नव्हे तर त्याने तिच्या घरावर दगड मारून खिडकीच्या काचादेखील फोडल्या. तसेच तिच्या घराजवळील भिंतीवर तिच्याबाबत घाणेरडा मजकूर लिहून तिची बदनामी केली. त्याने तिचा केवळ विनयभंगच केला नाही तर तिला साक्ष दिल्यास जीवे मारू अशी धमकीदेखील दिली. ३ एप्रिलपर्यंत हा प्रकार चालला. या प्रकारामुळे हादरलेल्या महिलेने अखेर लकडगंज पोलीस ठाणे गाठले व तक्रार दाखल केली. पोलिसांनी सर्फराजविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.