Threatened to rape after release on bail | जामिनावर सुटताच पुन्हा दिली अत्याचाराची धमकी
जामिनावर सुटताच पुन्हा दिली अत्याचाराची धमकी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बलात्कार आणि अपहरणाच्या प्रकरणातून जमानतीवर सुटका होताच दिवसाढवळ्या भर रस्त्यावर पीडित बालिकेला अडवून तिच्या बहिणीवर अत्याचार करण्याची धमकी देण्याचा प्रकार उजेडात आला आहे. ही घटना मंगळवारी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
आरोपीचे नाव करण कांबळे (२२ वर्षे) असून तो अपराधी वृत्तीचा आहे. त्याने दोन वर्षापूर्वी या १७ वर्षीय विद्यार्थिनीची अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत छेड काढली होती. पोलिसात तक्रार झाल्यानंतर काही दिवसांनी त्याने या मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केला होता. या घटनेनंतर दाखल केलेल्या दुसऱ्या तक्रारीवरून करणवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अलीकडे महिनाभरापूर्वीच त्याची जमानतीवर सुटका झाली होती.
दरम्यान, मंगळवारी दुपारी औषध खरेदीसाठी दुकानात जाताना करणने तिला पकडले. आपल्याविरुद्धची तक्रार परत न घेतल्यास तिच्या बहिणीवर अत्याचार करण्याची धमकी दिली. एवढेच नाही तर चार महिन्यानंतर ती कायद्यानुसार सज्ञान झाल्यावर तिच्यासोबत कोर्टात लग्न करण्याची धमकीही त्याने दिली. हा प्रकार मुलीने आईवडिलांना सांगितल्यावर त्याला जाब विचारला. मात्र त्यांनाही करणने मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे हे कुटुंब दहशतीखाली आले आहे. पोलिसांनी छेडखानी, धमकी, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर करण फरार झाला आहे.

Web Title: Threatened to rape after release on bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.