‘सीजीओ कॉम्प्लेक्स’ला बॉम्बने उडविण्याची धमकी, सुरक्षायंत्रणांची धावाधाव

By योगेश पांडे | Updated: June 6, 2025 16:55 IST2025-06-06T16:55:20+5:302025-06-06T16:55:42+5:30

‘पेसो’च्या कार्यालयात ई-मेलच्या माध्यमातून देण्यात आली धमकी : स्फोटके न आढळल्याने सुटकेचा नि:श्वास

Threat to blow up CGO Complex with bomb, security forces rush to the spot | ‘सीजीओ कॉम्प्लेक्स’ला बॉम्बने उडविण्याची धमकी, सुरक्षायंत्रणांची धावाधाव

Threat to blow up CGO Complex with bomb, security forces rush to the spot

योगेश पांडे - नागपूर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
सेमिनरी हिल्स येथील सीजीओ कॉम्प्लेक्सला बॉम्बने उडविण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली होती. इमारतीतच असलेल्या ‘पेसो’च्या (पेट्रोलियम अँड एक्सप्लोझिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन) कार्यालयाला ई-मेलच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आली. धमकीची माहिती समोर येताच शुक्रवारी नागपूर पोलिसांमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी संपूर्ण सीजीओ कॉम्प्लेक्सची कसून झडती घेतली. मात्र पोलिसांना कोणतेही स्फोटके सापडली नाहीत. धमकी म्हणजे खोडसाळपणा असल्याचे स्पष्ट होताच सुरक्षायंत्रणांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. विविध स्फोटक कारखान्यांच्या सुरक्षा ऑडिट व त्यांना दिशानिर्देश जारी करण्याचे काम ‘पेसो’च्या माध्यमातून होत असते. शुक्रवारी ‘पेसो’च्या कार्यालयाला ई-मेलद्वारे संबंधित धमकी मिळाली. कार्यालयासह दुपारी अडीच वाजेपर्यंत सीजीओ कॉम्प्लेक्स उडविण्यात येईल असे त्यात नमूद होते. संबंधित कॉम्प्लेक्समध्ये अनेक महत्त्वाची सरकारी कार्यालये आहेत. याची माहिती तातडीने पोलीस व इतर सुरक्षायंत्रणांना देण्यात आली. गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे पथक, बॉम्बशोधक व नाशक पथक तेथे पोहोचले. त्यांनी पूर्ण कॉम्प्लेक्सची झडती घेतली. मात्र तेथे कुठलीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. सर्व सुरक्षा तपासणी पूर्ण झाली आहे आणि सध्या इमारत पूर्णपणे सुरक्षित आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

कार्यालयांमधील कामांना फटका
संबंधित इमारतीत मोठ्या प्रमाणावर केंद्र शासनाशी निगडीत सरकारी कार्यालये आहेत. बीडीडीएस पथक पोहोचल्यावर काही कार्यालयांतील कर्मचारी-अधिकाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले. त्यामुळे खळबळ उडाली होती. कर्मचाऱ्यांमध्ये या धमकीसंदर्भात विविध चर्चांना ऊत आला होता व कामे खोळंबली होती. मात्र दुपारनंतर सर्वच कार्यालयांत सुरळीतपणे काम सुरू झाले.

अगोदर हायकोर्ट, आता सीजीओ

काही दिवसांअगोदर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातदेखील बॉम्ब असल्याची धमकी प्राप्त झाली होती. एका निनावी मेलद्वारे ती धमकी आली होती. परत पेसो व सीजीओ कॉम्प्लेक्सबाबतदेखील तयाच प्रकार घडला आहे. ईमेलद्वारे आलेली धमकी कोणाकडून आली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, नागपूर सायबर सेलला अलर्ट करण्यात आले असून, ईमेलचा स्त्रोत शोधण्यासाठी तांत्रिक तपास सुरू करण्यात आला आहे. संबंधित ईमेलचा आयपी अॅड्रेस, सर्व्हर लोकेशन यांचा मागोवा घेण्यात येत आहे.

Web Title: Threat to blow up CGO Complex with bomb, security forces rush to the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर