नगर रचना विभागाकडे हजारो अर्ज प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:08 IST2021-04-09T04:08:18+5:302021-04-09T04:08:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. विकास कामासाठी निधी मिळत नसल्याची नगरसेवकांची ओरड सुरू आहे. ...

नगर रचना विभागाकडे हजारो अर्ज प्रलंबित
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. विकास कामासाठी निधी मिळत नसल्याची नगरसेवकांची ओरड सुरू आहे. दुसरीकडे मनपाचा मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या नगर रचना विभागाकडे घराचे बांधकाम नकाशे व आरएलसाठी नासुप्र ले-आऊटमधील व शहरी भागातील भूखंडधारकांनी केलेले हजारो अर्ज मागील काही महिन्यापासून या विभागाकडे प्रलंबित आहेत. मंजुरीसाठी अर्जधारक कोरोना काळात मनपा मुख्यालयात चकरा मारत आहेत.
नगर रचना विभागाला बांधकाम नकाशासाठी एकूण ३,९२५ अर्ज प्राप्त झाले. यापैकी १,९९८ अर्ज मंजूर तर, १२१ अर्ज नामंजूर केले असून, १,६२२ अर्ज प्रलंबित आहेत. याशिवाय आरएलसाठी १,६०६ अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी ६३८ अर्ज मंजूर आणि २४ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत, तर ९४४ अर्ज प्रलंबित आहेत. असे एकूण २,५६६ अर्ज विभागाकडे प्रलंबित आहेत.
५७२ अंतर्गत येणाऱ्या ले-आऊटमधील बांधकाम नकाशे मुदतीत मंजूर होत नसल्याच्या भूखंडधारकांच्या तक्रारी आहेत. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी नगर रचना विभागाचे उत्पन्न १९० कोटी झाले होते. यावर्षी मार्चअखेरीस जेमतेम ८२ कोटींचा महसूल जमा झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत १०८ कोटींनी उत्पन्न कमी आहे. निधी मिळत नसल्याने प्रभागातील अत्यावश्यक कामे होत नसल्याचा नगरसेवकांचा आरोप आहे, तर दुसरीकडे विभागाकडे हजारो अर्ज प्रलंबित आहेत.
...
दोन महिन्यात अर्ज निकाली काढा
नासुप्र ले-आऊटमधील व शहरी भागातील प्रलंबित बांधकाम नकाशे दोन महिन्यात शासनाच्या दिशानिर्देशानुसार मंजूर करा, असे निर्देश स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे सभापती राजेंद्र सोनकुसरे यांनी गुरुवारी समितीच्या ऑनलाईन बैठकीत नगर रचना विभागाला दिले. उपसभापती निशांत गांधी, सदस्या वैशाली रोहणकर, रूपा राय, वंदना चांदेकर, उपायुक्त (महसूल) मिलिंद मेश्राम, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, नगर रचना विभागचे सहायक संचालक हर्षल गेडाम आदी उपस्थित होते.
...
मनपाच्या जागांवर फलक लावा
शहरात दहा झोनअंतर्गत येणाऱ्या मनपाच्या खुल्या जागांवर सुरक्षा भिंत आणि सूचना फलक लावण्यात यावे. शहरातील ज्या जागा अजूनही मनपाच्या नावावर झालेल्या नाहीत, त्या मनपाच्या नावावर करण्याचे दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. यासंबंधीचा उत्पन्न वाढविण्यासाठी होर्डिंग्जसाठी नवीन जागा शोधाव्यात, शहरात असणाऱ्या अवैध टॉवरवर कारवाई करावी, असे निर्देश दिले.
....
नगर रचना विभाकडे प्राप्त अर्ज- ३,९२५
मंजूर अर्ज- १,९९८
प्रलंबित अर्ज - १,६२२
आरएलसाठी प्राप्त अर्ज-१,६०६
मंजूर अर्ज- ६३८
प्रलंबित अर्ज- ९४४