नागपूर : २००९ सालापासून नागपूर जिल्ह्यातील ११ सहकारी पतसंस्था बंद असल्यामुळे ६० हजार ठेवीदार वाऱ्यावर असल्याची तक्रार शासनाने गंभीरतेने घेतली आहे. यातील पाच पतसंस्थांच्या ७४ संचालक व ३ कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले असून ठेवीदारांना ठेवी देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. शिवसेनेच्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून अडचणीत आलेल्या ११ पतसंस्थांसंदर्भात प्रश्न उपस्थित केला. या पतसंस्थांबाबत ६ नोव्हेंबर रोजी ठेवीदार जेष्ठ नागरिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यपालांकडे तक्रार केली होती. यातील एक पतसंस्था अडचणीतून बाहेर पडल्याने उर्वरित १० सहकारी पतसंस्थांवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० नुसार कार्यवाही करण्यात येत आहे. यातील पाच संस्थांची चौकशी सुरू असून कळमना अर्बन क्रेडिट सोसायटी व चैतन्यवाडी अर्बन क्रेडिट सोसायटी या संस्थेच्या दोषी पदाधिकाऱ्यांवर सव्वा बारा कोटी व ६४ लाख ९२ हजार रुपयांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे असे राज्यमंत्र्यांनी सभागृहासमोर स्पष्ट केले. ठेवीदारांना संरक्षण देण्यासाठी राज्य शासन पूर्ण प्रयत्न करीत आहे. कर्जवसुली किंवा संचालकांकडील नुकसान भरपाई वसुलीतून ठेवी देण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. संबंधित सदस्यांची लवकरच बैठकदेखील घेण्यात येईल अशी माहितीदेखील त्यांनी दिली. (प्रतिनिधी)
‘त्या’ ठेवीदारांना संरक्षण देणार
By admin | Updated: December 13, 2014 02:52 IST