धर्म वाचविण्यासाठी बलिदान देणारे आदर्शच : सरसंघचालक मोहन भागवत
By योगेश पांडे | Updated: August 6, 2025 18:55 IST2025-08-06T18:55:13+5:302025-08-06T18:55:44+5:30
Nagpur : धर्मजागरण न्यासाच्या कार्यालयाचे उद्घाटन

Those who sacrifice to save religion are ideal: RSS chief Mohan Bhagwat
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनेकांच्या जीवनात कठीण प्रसंग येतात व त्यांचे धैर्य तुटते. त्यातून ते सन्मार्ग सोडतात. पण, पुरुषार्थी लोक न थकता व न थांबता पूर्ण शक्ती लावून धर्माप्रति पक्के राहतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात संकटे आली, पण त्यांनी शक्ती व युक्तीने मार्ग काढलाच. मनुष्याच्या मनात धर्माची निष्ठा पक्की हवी. धर्मासाठी अनेकांनी बलिदान दिले आहेत. त्यांच्यावर अत्याचार झाले, पण त्यांनी धर्म नाही सोडला. असेच लोक आपल्यासमोरील आदर्श असले पाहिजेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. नागपुरातील भगवाननगरात धर्मजागरण न्यासाच्या नवनिर्मित कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते बुधवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते.
धनश्री सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य भय्याजी जोशी, प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, सहसंघचालक श्रीधर गाडगे, महानगर संघचालक राजेश लोया, धर्मजागरण न्यासचे अखिल भारतीय पदाधिकारी शरद ढोले, न्यासचे अध्यक्ष विजय कैथे प्रामुख्याने उपस्थित होते.
जगातील लोक म्हणतात की, आपण वेगवेगळे आहोत व म्हणून एक व्हावे लागेल. मात्र, आपला धर्म विविधतांचा स्वीकार करण्याची शिकवण देतो. हिंदूधर्म मानवधर्माचे आचरणच शिकवतो. सर्वांचा मार्ग वेगवेगळा असला तरी गंतव्य एकाच जागी असते. त्यामुळे इतरांचा रस्ता बदलण्याचा प्रयत्न करायला नको. तुमचा मार्ग कुठला आहे, यावर संघर्ष व्हायला नको. धर्मजागरण होईल तेव्हाच हिंदू धर्माच्या आचरणाचा समूह अस्तित्वात राहील. धर्म ग्रंथापुरता मर्यादित राहणार नाही. जगाला दिशा दाखविण्यासाठी जगासमोर तसे मॉडेल तयार करणे ही भारताचीच जबाबदारी आहे, असे सरसंघचालक म्हणाले. सुनील भूगावकर यांनी सूत्रसंचालन केले.
धर्म ठीक असला तर समाजात संतुलन-शांती शक्य
धर्म म्हणजे कर्तव्य हा आपला विचार आहे. त्यातूनच राजधर्म, प्रजाधर्म, पितृधर्म या गोष्टी समोर आल्या. सनातन धर्म हा आत्मीयता व विविधतेचा पूर्ण स्वीकार करणे शिकवतो. भारतात विविधता असली तरी शेवटी सर्व लोक एकच आहेत. सर्व विविधतांचा स्वीकार करणे हाच खरा धर्म आहे. लोकांचे मार्ग वेगवेगळे असले तरी त्याचे गंतव्य एकच असते. धर्माचे कार्य हे केवळ ईश्वरासाठी नसते तर ते समाजासाठीदेखील असते. त्यामुळेच धर्म ठीक असला तर समाजात संतुलन व शांती नांदू शकते असे सरसंघचालक म्हणाले.