‘त्या’ मतदारांना यादीतून वगळणे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:09 IST2021-03-23T04:09:59+5:302021-03-23T04:09:59+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : निवडणूक आयाेगाने मतदारांच्या ओळखपत्रासाेबतच त्यांचे फाेटाे मतदारयादीवर असणे अनिवार्य केले आहे. ज्यांचे या यादीत ...

‘त्या’ मतदारांना यादीतून वगळणे सुरू
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : निवडणूक आयाेगाने मतदारांच्या ओळखपत्रासाेबतच त्यांचे फाेटाे मतदारयादीवर असणे अनिवार्य केले आहे. ज्यांचे या यादीत फाेटाे नाही, त्यांची नावे मतदारयादीतून वगळण्यात येणार असल्याची सूचनाही नागरिकांना देण्यात आली हाेती. त्याअनुषंगाने रामटेक विधानसभा मतदारसंघातील १,०७३ मतदारांचे फाेटाे मतदारयादीत नसल्याने त्यांची नावे या यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी २३ नाेव्हेंबर २०२० राेजी यासंदर्भात निर्देश दिले हाेते. त्या निर्देशानुसार विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारयाद्यांच्या पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यात रामटेक विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. या मतदारसंघातील १,२१४ मतदारांचे फाेटाे मतदारयादीत नसल्याचे निरीक्षणात आढळून आले आहे. ही बाब लक्षात येताच यातील १४१ मतदारांनी त्यांचे फाेटाे निवडणूक कार्यालयात सादर केले. त्यामुळे फाेटाे नसलेल्या उर्वरित १,०७३ मतदारांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
ही यादी मतदारांना बघता येईल. या यादीतील माहितीवर कुणाचे दावे, हरकती अथवा आक्षेप असतील त्यांनी ते लेखी तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाकडे सादर करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या हाेत्या. दरम्यान, मतदारयादीत फाेटाे नसलेल्या मतदारांची चाैकशी करण्यात आली. ज्या मतदारांचे मतदारयादीत फाेटाे नाहीत, त्यांनी त्यांचे दावे, हरकती व आक्षेप तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाकडे सादर करावे, असे आवाहन तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी केले असून, फाेटाे नसणाऱ्यांची नावे मतदारयादीतून वगळण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.