लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिन २५ दिवसांवर आला आहे. परंतु, अजूनही दीक्षाभूमीवर कुठलीही तयारी सुरू झालेली नाही. याबाबत अनेक सामाजिक संघटनांनी शासन व प्रशासनाला पत्रसुद्धा लिहिले आहे. दीक्षाभूमी स्मारक समितीतील अंतर्गत वाद सुरू असतानाच, सोयीसुविधांसाठी प्रशासनाच्या आडमुठी धोरणामुळे संघटना चिंतित आहेत. एकूणच यंदा दीक्षाभूमीवर येणाऱ्या लाखो अनुयायांचे हाल होण्याची भीती वर्तविली जात आहे.
यावर्षी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन चळवळीच्या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमीवर प्रचंड जनसमुदाय उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, दिवस कमी आहेत मात्र तयारी सुरू झालेली नाही. परिणामी गैरसोय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच पार्श्वभूमीवर तयारीसंदर्भात स्मारक समितीला जाब विचारण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक व विविध सामजिक व धार्मिक संघटनांची बैठक दीक्षाभूमीवर पार पडली. पद्माकर गणवीर हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी स्मारक समितीचे सदस्य डॉ. सुधीर फुलझेले हेसुद्धा उपस्थित झाले होते. त्यांनी तयारीसंदर्भात स्मारक समितीची बैठक होणार असून धम्मचक्र प्रवर्तन दिनाची तयारी पूर्ण करण्याची हमी दिली.
या बैठकीला भारतीय बौद्ध महासभेचे महानगर अध्यक्ष जे. आर. गोडबोले, विलास उंदीरवाडे, राज्य संघटक भीमराव फुसे, कास्ट्राइबचे अध्यक्ष अरुण गाडे यांच्यासह विविध संघटनांचे महिला-पुरुष पदाधिकारी व बौद्ध बांधव उपस्थित होते.