यंदाचा उन्हाळा जास्तच ‘ताप’दायक ठरणार; मार्चच्या पहिल्याच आठवड्यात तापमानाने मारली उसळी

By निशांत वानखेडे | Updated: March 5, 2025 18:37 IST2025-03-05T18:34:53+5:302025-03-05T18:37:42+5:30

मार्च महिन्यातही उष्ण लाटेचा इशारा : हवामान खात्याचा इशारा

This summer will be more 'hot'; The temperature jumped in the first week of March | यंदाचा उन्हाळा जास्तच ‘ताप’दायक ठरणार; मार्चच्या पहिल्याच आठवड्यात तापमानाने मारली उसळी

This summer will be more 'hot'; The temperature jumped in the first week of March

नागपूर : मार्चच्या पहिल्याच आठवड्यात विदर्भातच नाही तर महाराष्ट्रात तापमानाने उसळी घेतली आहे. त्यामुळे हवामान खात्याचेही कान टवकारले आहेत. बदलत्या वातावरणानुसार यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक ठरण्याचा व मार्च ते मे या काळात नेहमीपेक्षा अधिक दिवस उष्ण लाटांचा सामना करावा लागण्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे.

दरवर्षी साधारणत: हाेळीपर्यंत थंडीची जाणीव हाेत राहते व तापमान नियंत्रणात असते. यावर्षी मात्र फेब्रुवारीपासून सूर्य तापायला लागला आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवाड्यात पारा सरासरीपेक्षा २ ते ४ अंशाने अधिक म्हणजे ३२ ते ३५ अंशापर्यंत कायम राहिला. मार्चच्या सुरुवातीपासूनच कमाल तापमानाने ३५ अंशाच्या वर घाेडदाैड सुरू केली आहे. मंगळवारी म्हणजे ४ मार्च राेजी राज्यातील बहुतेक शहरे चांगलीच तापलेली हाेती. मध्य महाराष्ट्रातील साेलापूर शहर ३९.४ अंशासह सर्वाधिक तापलेले हाेते. त्याखालाेखाल चंद्रपूर ३९ अंशावर, तर नागपूरचा पारा ३७.६ अंश नाेंदविण्यात आला. तापमानवाढीचे हे सत्र पुढेही कायम राहणार असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन वेधशाळेने केले आहे.

वेधशाळेचा हा आहे इशारा

  • वेधशाळेच्या अंदाजानुसार यंदा मार्च ते मे महिन्यापर्यंत उत्तर व मध्य भारतासह बहुतेक भागात तापमान सरासरीपेक्षा ५ किंवा त्यापेक्षा अधिक अंशाने वर राहण्याची शक्यता आहे.
  • उष्ण लाटांचे दिवस नेहमीपेक्षा अधिक राहतील.
  • उत्तर व मध्य भारताला मार्चमध्येच उष्ण लाटांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

 

काय आहे कारण?

वेधशाळेने तापमान वाढीसाठी काेणत्याही कारणाचे स्पष्टीकरण दिले नाही. मात्र यंदाचा उन्हाळा नेहमीपेक्षा अधिक तापणार, हा अंदाज मात्र व्यक्त केला आहे. काही तज्ज्ञांच्या मते एप्रिलमध्ये लाॅ-निनाचा प्रभाव संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमान वाढ हाेईल, अशी शक्यता व्यक्त केली आहे.

Web Title: This summer will be more 'hot'; The temperature jumped in the first week of March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.