'हा विरोधकांचा करंटेपणाच !' ४८ टक्के एकट्या भाजपचे नगरसेवक; सगळीकडेच विकासगंगा पोहचविण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
By योगेश पांडे | Updated: December 21, 2025 19:14 IST2025-12-21T19:12:27+5:302025-12-21T19:14:02+5:30
Nagpur : नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणूकीत भाजपला मिळालेला अभूतपूर्व विजय हा केवळ जनतेच्या विश्वासामुळेच शक्य झाला आहे.

'This is the opposition's failure!' 48 percent corporators are BJP alone; Chief Minister assures to bring Vikas Ganga everywhere
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणूकीत भाजपला मिळालेला अभूतपूर्व विजय हा केवळ जनतेच्या विश्वासामुळेच शक्य झाला आहे. पुढील काळात राज्यातील सर्व भागांचाच राजकारण बाजुला सारून विकास करण्यावर आमचा भर असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नागपुरात रविवारी ते पत्रपरिषदेदरम्यान बोलत होते.
आम्ही आमच्या कार्यकाळात केलेल्या कामांची पावती जनतेने निकालातून दिली आहे. राज्यात ज्या ठिकाणी आम्हाला अपयश आले तेथेदेखील आम्ही विकास पोहोचवून दाखवून २०१७ मध्ये आमचा पक्ष क्रमांक एकवर होता व १६०२ नगरसेवक निवडून आले होते. आता ३३२५ नगरसेवक निवडून आले आहेत. ४८ टक्के एकट्या भाजपचे नगरसेवक आहे. याचाच अर्थ मोठे जनसमर्थन आम्हाला मिळाले आहे.
पक्ष संघटनेत चांगला समन्वय होता व त्यातूनच अभूतपूर्व विजय मिळाला आहे. मागील २०-२५ वर्षांतील हा कुठल्याही पक्षाचा सर्वात मोठा विजय आहे. आम्ही निवडणूकीत केवळ सकारात्मक प्रचारावर भर ठेवला. कोणत्याही विरोधक नेता, पक्षाविरोधात बोललो नाही. आम्ही केलेले काम व पुढे काय करणार याची ब्ल्यू प्रिंट जनतेसमोर मांडली. भारताच्या इतिहासात अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी कुणावरही टीका न करता झालेली ही पहिलीच निवडणूक आहे, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व नागपूर महानगरपालिका निवडणूकीसाठी पक्ष प्रभारी आ.प्रवीण दटके उपस्थित होते.
कार्यकर्त्यांसाठी आमचे नेते उतरले जमिनीवर
विरोधकांना अगोदरपासूनच महायुतीचा विजय दिसला होता. त्यामुळेच ते बाहेर पडले नाही. आता आम्ही प्रचारात उतरलो नाही व गंभीरतेने निवडणूक घेतली नाही असे ते म्हणतील. मात्र ही कार्यकर्त्यांची निवडणूक होती. जे कार्यकर्ते विधानसभा-लोकसभेत निवडून आणतात, त्यांच्यासाठी नेत्यांनी जर स्वत:ची प्रतिष्ठा पणाला लावली नाही तर तो करंटेपणाच म्हणावा लागेल, असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी काढला. व्होटचोरी हा मुद्दाच नाही हे जोपर्यंत विरोधकांना समजणार नाही तोपर्यंत आमचा फायदाच आहे, असेदेखील ते म्हणाले.
चंद्रपूरच्या निकालावर मंथन करणार
चंद्रपुरात अपेक्षित निकाल लागला नाही. तेथील निकालावर आम्ही मंथन करू. तसेच महानगरपालिका निवडणूकीत तेथील कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करू. संपूर्ण ताकद झोकून या निकालाची भरपाई महानगरपालिका निवडणूकीत करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. चंद्रपुरातील ‘इनकमिंग’बाबत सुधीर मुनगंटीवार यांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्याबाबत विचारणा केली असता पक्षाला कुठलीही दारेच असू नयेत. प्रवेश देत असताना व्यक्ती योग्य आहे की नाही हे बघणे महत्त्वाचे ठरते. जर पक्षाने काही प्रवेश दिले असतील तर त्याचा फायदाच झाला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
महानगरपालिकेत आणखी दमदार कामगिरी
या निकालांतून जनतेच्या मनात भाजप असल्याचे स्पष्ट झाले आहे. नगरपालिकेपेक्षा जास्त चांगला निकाल महानगरपालिकांचा असेल व तेथे आणखी दणदणीत यश मिळेल असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.