नागपूर : कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक ठरणार असल्याचा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता, जिल्हा परिषदेने प्रत्येक तालुक्यात कोविड केअर सेंंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक आहे. अशा परिस्थितीत या मुलांमध्ये होणारा संसर्ग रोखणे महत्त्वाचे ठरणार आहे. ग्रामीणमध्ये पाहिजे त्याप्रमाणात डॉक्टर नाही. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग झालाच तर त्यांच्यावर वेळीच योग्य उपचार व्हावेत यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्याच्या १३ ही तालुक्यात लहान मुलांकरिता कोविड केअर सेंटर (सीसीसी) उभारण्यात येणार असल्याची माहिती जि.प. अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी दिली.
तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन बालरोग तज्ज्ञांचा समावेश असलेली टास्क फोर्स विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी तयार केली आहे. त्याच धर्तीवर ग्रामीण भागातही तालुक्यातील प्रत्येक एका पीएचसीमध्ये ५० खाटांचे ‘चाईल्ड कोविड केअर सेंटर’ उभारण्यात येणार आहे. यामध्ये ऑक्सिजन बेडची व्यवस्था राहील. याकरिता जि.प. सेस फंडात असलेला निधी सोबतच जिल्हा नियोजन समितीकडूनही निधीची मागणी करण्यात येणार आहे. यासंदर्भात नुकतीच जिल्हा परिषदेच्या सदस्यांची बैठक पार पडली.
- दोन टास्क फोर्स करणार तयार
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बालरोग तज्ज्ञांच्या दोन टास्क फोर्स तयार करण्यात येईल. यासाठी ग्रामीण भागातील बालरोग तज्ज्ञांसोबत शहरातील बालरोग तज्ज्ञांचा समावेश करण्यात येईल. या दोन्ही टास्क फोर्स जिल्ह्याच्या १३ ही तालुक्यातील कामकाजावर लक्ष ठेवतील.