डिजिटल युगाचे तिसरे नुक्कड साहित्य संमेलन नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 11:25 PM2019-02-12T23:25:52+5:302019-02-12T23:28:19+5:30

डिजिटल विश्वात दीडशे लेखक आणि सव्वा लाखाहून अधिक वाचकांनी चालविलेली अनोखी साहित्य चळवळ म्हणजे ‘नुक्कड’. मोबाईल किंवा इंटरनेटवर फेसबुकसारख्या समूह माध्यमात व्यक्त होणाऱ्या नव्या दमाच्या लेखकांचे तिसरे नुक्कड साहित्य संमेलन येत्या १६ व १७ फेब्रुवारी रोजी नागपुरात होऊ घातले आहे. एमएलए होस्टेल येथे ज्येष्ठ साहित्यिक व मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके, प्रभा गणोरकर व गणेश कनाटे यांच्या उपस्थितीत हे अनोखे साहित्य संमेलन रंगणार आहे.

The Third Nukkad Literary Meet of the Digital Age was held in Nagpur | डिजिटल युगाचे तिसरे नुक्कड साहित्य संमेलन नागपुरात

डिजिटल युगाचे तिसरे नुक्कड साहित्य संमेलन नागपुरात

Next
ठळक मुद्देफेसबुक पेजवरून बहरलेली साहित्य चळवळ : १६ व १७ ला आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डिजिटल विश्वात दीडशे लेखक आणि सव्वा लाखाहून अधिक वाचकांनी चालविलेली अनोखी साहित्य चळवळ म्हणजे ‘नुक्कड’. मोबाईल किंवा इंटरनेटवर फेसबुकसारख्या समूह माध्यमात व्यक्त होणाऱ्या नव्या दमाच्या लेखकांचे तिसरे नुक्कड साहित्य संमेलन येत्या १६ व १७ फेब्रुवारी रोजी नागपुरात होऊ घातले आहे. एमएलए होस्टेल येथे ज्येष्ठ साहित्यिक व मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके, प्रभा गणोरकर व गणेश कनाटे यांच्या उपस्थितीत हे अनोखे साहित्य संमेलन रंगणार आहे.
व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकसारखे डिजिटल युगाचे समूह माध्यम आता केवळ संवादाचे नाही तर साहित्याचेही माध्यम ठरू पाहत आहे. दररोज असंख्य तरुण व नव्या दमाचे लेखक, कवी यावर व्यक्त होऊ लागले आहेत. अशा नवसाहित्यिकांना एक हक्काचे व्यासपीठ देण्याचे काम काही लोकांनी केले आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे साहित्यिक व नाटककार विक्रम भागवत होय. भागवत यांनी पाच वर्षापूर्वी ‘न लिहिलेले पत्र’ या नावाने एक फेसबुक पेज सुरू केले. आश्चर्य म्हणजे अल्पावधीत या पेजला प्रचंड लोकप्रियता मिळाली. मानसशास्त्र, मानवी नातेसंबंध, चित्रपट समीक्षा रसग्रहण, आयुर्वेदिक मते असे साहित्यिक, सामाजिक भान जपणारे व मानवी भावभावनांचे चित्रण करणारे विषय पत्रमालिकांच्या माध्यमातून असंख्य लोकांकडून पेजवर व्यक्त होऊ लागले. आजपर्यंत सात हजाराच्यावर पत्र या पेजवरून प्रकाशित झाले. या पेजला व्यापक रूप देत भागवत यांनी सुनील गोवर्धन व जयंत पोंक्षे यांच्या सहकार्याने बुक हंगामा डॉट कॉम हे वेब स्टोअर सुरू केले. या स्टोअरवर गेल्या तीन वर्षात एक हजाराहून अधिक डिजिटल व ई-बुक्स तसेच २०० हून अधिक ऑडिओ बुक्स प्रकाशित झाले. त्यानंतर त्यांनी नुुक्कड हे लघुकथांचे व्यासपीठ सुरू केले. विशेष म्हणजे महाराष्ट्रच नाही तर जगभरातील मराठी लेखक व वाचकांनी हे व्यासपीठ समृद्ध केले. चारोळ्यापासून कथापर्यंत सर्वच यावर प्रकाशित होऊ लागले. एक हजाराहून लघुकथा यावर प्रकाशित झाल्या. नुक्कडवरील साहित्याला साहित्य संमेलनाचे रूप आयोजकांनी दिले असून त्याचे तिसरे संमेलन नागपुरात होत आहे.
संमेलनात राज्यातून १५० लेखक सहभागी होणार असल्याची माहिती संयोजक स्वाती धर्माधिकारी यांनी दिली.
पहिल्या दिवशी ९.३० ते १ वाजतादरम्यान विक्रम भागवत यांच्या कथा अभिवाचनानंतर संमेलनाचे उद््घाटन होईल. गणेश कनाटे व माधवी वैद्य हे बीजभाषण करतील. यासोबतच चित्रकार चंद्रकांत चन्ने यांच्यासह ‘एक पान कवितेचे एक पान चित्रांचे’चे सादरीकरण होईल. पहिल्या सत्रात सतीश तांबे यांच्या अध्यक्षतेत ‘कथा आता कुठे’ विषयावर चर्चासत्र व नंतर ‘जगेल?’ विषयावर परिसंवाद होईल. यानंतर विविध विभागातून निवडण्यात आलेल्या ५० लेखकांना नुक्कड पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. सायंकाळी डॉ. प्राजक्ता हसबनीस व साथीदारांसह ‘बोलावा विठ्ठल’ हा कार्यक्रम सादर होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता नाट्यकर्मी सदानंद बोरकर यांच्यासह झाडीपट्टी रंगभूमीवर सादरीकरण होईल. यानंतर नुक्कड साथीदारांसह कवी संमेलन व दुसऱ्या सत्रात स्वाती धर्माधिकारी यांच्यासह नुक्कड कथा अभिवाचन होईल. दुपारी ३.३० वाजता संमेलनाचा समारोप होईल.

 

Web Title: The Third Nukkad Literary Meet of the Digital Age was held in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.