विचारवंत हा समाजाचा मार्गदर्शक
By Admin | Updated: September 30, 2014 00:38 IST2014-09-30T00:38:13+5:302014-09-30T00:38:13+5:30
मनुष्य हा विचार करणारा प्राणी आहे. त्याला विचाराशिवाय समाधान मिळत नाही. यापुढे समाजाविषयी विचार करणारा तो ‘विचारवंत’असतो. विचारवंताला कोणत्याही अपेक्षा नसतात.

विचारवंत हा समाजाचा मार्गदर्शक
व्याख्यान : सदानंद मोरे यांचे प्रतिपादन
नागपूर : मनुष्य हा विचार करणारा प्राणी आहे. त्याला विचाराशिवाय समाधान मिळत नाही. यापुढे समाजाविषयी विचार करणारा तो ‘विचारवंत’असतो. विचारवंताला कोणत्याही अपेक्षा नसतात. तो केवळ समाजाचा मार्गदर्शक असतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी केले.
विदर्भ साहित्य संघाच्यावतीने ग. त्र्यं. माडखोलकर स्मृतिप्रीत्यर्थ ‘समकालीन विचारवंत आणि समाजवास्तव’ या विषयावर सोमवारी आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमत नागपूरचे संपादक व ज्येष्ठ साहित्यिक प्रा. सुरेश द्वादशीवार होते. अतिथी म्हणून विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष वामन तेलंग होते. सीताबर्डी येथील विदर्भ साहित्य संघाच्या सांस्कृतिक संकुलातील सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.
डॉ. मोरे पुढे म्हणाले, विचारवंत स्वत:ला काही मर्यादा घालून घेतात, आणि त्याच विचाराच्या ओझ्याखाली ते वावरतात. त्यामुळे त्यांना ‘समाजवास्तवा’चे आकलन होत नाही. ते स्वत:भोवती आपल्या विचारांची चौकट निर्माण करून घेतात. यात कुणी स्वत:ला मार्क्सवादी मानतो, कुणी हिंदुत्ववादी तर कुणी बुद्धीवादी. ते सर्व समाजाचे चिंतन करण्याऐवजी आपआपल्या विचारात गुरफटतात. ज्येष्ठ विचारवंत यदुनाथ सरकार यांनी १९१९ मध्ये महाराष्ट्र हा २०१९ मध्ये अग्रेसर राहील, असे त्यावेळी सांगितले होते. कदाचित त्यावेळचा एकसंघ महाराष्ट्र पाहून ते बोलले असावे. परंतु आज महाराष्ट्र २०१९ च्या उंबरठ्यावर असताना, येथील संपूर्ण समाजवास्तव बिघडले असल्याचे त्यांनी सांगितले. इतिहासाविषयी बोलताना, महाराष्ट्रातील प्रत्येक जातीने आपल्या सोयीनुसार इतिहास लिहिला आहे. त्या सर्व जातींनी एकत्रित येऊन इतिहास घडविला, मात्र तो लिहिताना वेगवेगळा लिहिला आहे. यातून संपूर्ण इतिहास बिघडला आहे. त्याची विचारवंतांनी चिकित्सा करण्याची गरज आहे. मात्र त्यासाठी विचारवंताला समाजातील सर्व घटनाक्रम माहीत असला पाहिजे. विचारवंताने स्वत:ला अलिप्त ठेवून, समाजाला योग्य दिशा दाखविण्याचे काम केले पाहिजे. अन्यथा इतिहास बिघडला की, ‘समाजवास्तव’ही बिघडते, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
नववास्तव स्वीकारण्याची गरज
यावेळी प्रा. द्वादशीवार यांनी अध्यक्षीय भाषणातून संपूर्ण २० वे शतक मार्क्सवाद, गांधीवाद, हिंदुत्ववाद व आंबेडकरवाद या चार विचारसरणीने ढवळून निघाले असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, या सर्व विचारांना पुढे फाटे फुटत गेली आहेत. विशेष म्हणजे, चारही विचारप्रवाह १९३० पूर्वी जन्माला आले आहेत. यानंतर गेल्या ८० वर्षांत कोणताही नवा विचार पुढे आलेला नाही. यावरून या देशातील विचारच थांबला की काय, असा प्रश्न पडतो. घटनेने सर्वांना विचार स्वातंत्र्य दिले आहे. पण त्या स्वातंत्र्याचा उपयोग करणारे किती? असाही त्यांनी यावेळी प्रश्न उपस्थित केला. अनेक जण आपल्या राजकीय नेत्यांचे विचार स्वत:चेच समजू लागतात. मग तो खरा की खोटा, याचासुद्धा विचार होत नाही. देशात गत १९९० नंतर फार झपाट्याने बदल झाला आहे. समाजात आत्मभान आले आहे, शिवाय समाजजीवनाचे वास्तव बदलले आहे. यात जुने विचार घेऊन चालणारे विचारवंत मागे पडले असून, नव्या विचारांची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे बदलत्या समाजासोबत नववास्तवसुद्धा स्वीकारलेच पाहिजे, असे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन शुभदा फडणवीस यांनी केले. वामन तेलंग यांनी आभार मानले.