संशोधन शिष्यवृत्तीच्या निधीत होणार वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:57 IST2021-02-05T04:57:14+5:302021-02-05T04:57:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून ‘पीएच.डी.’ करणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. विद्यापीठाकडून ...

संशोधन शिष्यवृत्तीच्या निधीत होणार वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून ‘पीएच.डी.’ करणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. विद्यापीठाकडून ‘पीएच.डी.’ संशोधकांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीत तीन हजारांपर्यंत वाढ होऊ शकते. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करण्यासंदर्भात समिती गठीत करण्यात आली होती. अनेक बैठका झाल्यानंतर समितीने शिष्यवृत्तीच्या रकमेत तीन हजार रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी यांना मंजुरीसाठी पाठविण्यात येईल. त्यांची मंजुरी मिळाल्यानंतर प्रस्तावाला व्यवस्थापन परिषदेसमोर मांडण्यात येईल. तेथून हिरवी झेंडी मिळाल्यानंतर अर्थसंकल्पात यासाठी तरतूद करण्यात येईल.
२०१९ साली झालेल्या ‘सिनेट’च्या बैठकीत शिष्यवृत्तीची रक्कम वाढविण्याची मागणी करण्यात आली होती. यासंबंधात एक प्रस्तावदेखील मांडण्यात आला होता. त्यानंतर व्यवस्थापन परिषदेने चार सदस्यीय समिती गठीत केली होती. सद्यस्थितीत संशोधकांना पाच हजार रुपये प्रति महिना शिष्यवृत्ती मिळते. निर्णय लागू झाल्यानंतर ही रक्कम वाढून ८ हजार रुपये इतकी होईल.