व्यवस्था परिवर्तनासाठीही लढावे लागणार

By Admin | Updated: January 20, 2015 01:17 IST2015-01-20T01:17:18+5:302015-01-20T01:17:18+5:30

सत्ता परिवर्तनाने प्रश्न सुटत नाही. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीमध्ये परिवर्तन होणे आवश्यक आहे, असे डॉ. हेडगेवार यांचे म्हणणे होते. सत्ता परिवर्तन झाले. परंतु व्यवस्था बदलली का? व्यवस्था तशीच आहे.

There will also be a fight for system change | व्यवस्था परिवर्तनासाठीही लढावे लागणार

व्यवस्था परिवर्तनासाठीही लढावे लागणार

भामसंच्या अधिवेशनाचा समारोप : कृष्णचंद्र मिश्र यांचे आवाहन
नागपूर : सत्ता परिवर्तनाने प्रश्न सुटत नाही. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीमध्ये परिवर्तन होणे आवश्यक आहे, असे डॉ. हेडगेवार यांचे म्हणणे होते. सत्ता परिवर्तन झाले. परंतु व्यवस्था बदलली का? व्यवस्था तशीच आहे. त्यामुळे आता व्यवस्था परिवर्तनासाठीसुद्धा आम्हाला लढावे लागेल, असे आवाहन भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय संघटनमंत्री कृष्णचंद्र मिश्र यांनी येथे केले.
रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन येथे आयोजित भारतीय मजदूर संघाच्या १७ व्या विदर्भ प्रदेशच्या वार्षिक अधिवेशनाचा सोमवारी समारोप करण्यात आला. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. भारतीय मजदूर संघाचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष रमेश पाटील अध्यक्षस्थानी होते. तर पश्चिम क्षेत्रीय संघटक रामदौर सिंह, भामसंचे माजी वित्त सचिव वसंतराव पिंपळापुरे, भामसं महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रभाकर बानासुरे, ज्येष्ठ नेते दिनकरराव जोशी व्यासपीठावर होते.
कृष्णचंद्र मिश्र म्हणाले, नक्षलवाद ही एक समस्या आहे. परंतु लोक नक्षलवादाकडे का वळतात याचा विचार होत नाही. एखाद्या तरुणाच्या हातात बंदूक पकडण्याची परिस्थिती ही व्यवस्थाच निर्माण करीत असते, असेही त्यांनी स्पष्ट केले. भारतीय मजदूर संघ कामगारांच्या हितासाठी लढणारी कामगार संघटना आहे.
स्वतंत्र भारतानंतर लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या पं. नेहरूंपासून तर नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत प्रत्येक सरकार हे आमचेच आहे. जे सरकार कामगारांच्या हिताचा विचार करते, त्यांचे आम्ही समर्थन करतो. पण जे सरकार कामगारांच्या विरोधी भूमिका घेत असते, त्याविरोधात आम्ही आजवर लढत आलो आहोत, आणि यापुढेही लढत राहू, मग सरकार कुणाचेही असो. परंतु शत्रुसोबत लढणे सोपे असते, मात्र आपल्याच माणसाशी लढणे जरा कठीण असते, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
सत्ताधारी आणि अधिकारी हे कामगारांना काहीच किंमत देत नाही. तेव्हा कामगारांनी आपली शक्ती वाढवण्याची गरज आहे. सरकार कुणाचेही असो कामगारांच्या हितासाठी आम्ही लढत राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संघटनेला यावर्षी ६० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त कार्यकर्त्यांना वर्षभराचा कार्यक्रमसुद्धा त्यांनी यावेळी आखून दिला. ३० जुलै रोजी संघटनेच्या स्थापनादिनानिमित्त सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या घरावर संघटनेचा झेंडा लावावा आणि प्रत्येक जिल्ह्यात पूर्णवेळ कार्यरत एका कार्यकर्त्याची नियुक्ती करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. रमेश पाटील यांनीही आपले विचार व्यक्त केले. महामंत्री अशोक भुताड यांनी प्रास्ताविक व संचालन केले. (प्रतिनिधी)

Web Title: There will also be a fight for system change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.