ग्रामीण भागात एकही मृत्यू नाही, कोरोनाबाधितांचा ग्राफही घटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:07 IST2021-06-06T04:07:15+5:302021-06-06T04:07:15+5:30
सावनेर/काटोल/कुही/हिंगणा/उमरेड/कामठी : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांचा ग्राफ घटला आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या अहवालानुसार ग्रामीण भागात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद ...

ग्रामीण भागात एकही मृत्यू नाही, कोरोनाबाधितांचा ग्राफही घटला
सावनेर/काटोल/कुही/हिंगणा/उमरेड/कामठी : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांचा ग्राफ घटला आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या अहवालानुसार ग्रामीण भागात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही. तेरा तालुक्यांत २७६९ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ७१ (२.५६ टक्के) जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. १२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. ग्रामीण भागात आतापर्यंत १,४२,३४६ रुग्णांची नोंद झाली आहे. यातील १,३८,१८७ कोरोनामुक्त झाले, तर २२९७ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या सक्रिय रुग्णांची संख्या १४५८ इतकी आहे.
सावनेर तालुक्यात ६ रुग्णांची नोंद झाली. यात सावनेर शहरातील एक तर ग्रामीण भागातील ५ रुग्णांचा समावेश आहे. कामठी तालुक्यात १५३ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात ४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. कुही तालुक्यात १६२ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात वेलतुर व साळवा येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद करण्यात आली. हिंगणा तालुक्यात ११३ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात ६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात डिगडोह येथे ३, वानाडोंगरी २, तर हिंगणा येथील एकाचा समावेश आहे. तालुक्यात आतापर्यंत ११,९६१ रुग्णांची नोंद झाली. ११,६७८ कोरोनामुक्त झाले. उमरेड तालुक्यात ७ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील दोन तर ग्रामीण भागातील ५ रुग्णांचा समावेश आहे.
काटोल तालुक्याला दिलासा
कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या काटोल तालुक्यात ३५० नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. यामुळे गत दोन महिन्यांपासून त्रस्त असलेल्या काटोलकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
-----
कोरोनामुक्तीसाठी पर्यावरण संवर्धनाचा जागर
गावागावात वृक्षारोपण : झाडे जगविण्याचा संकल्प
नागपूर : कोरोनामुळे ऑक्सिजनचे महत्त्व जगाला कळले. ऑक्सिजनअभावी लाखो कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे मानवी आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी पर्यावरण संतुलित असणे आवश्यक आहे. त्यामुळे शुक्रवारी जागतिक पर्यावरण दिनाच्या पर्वावर नागपूर जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायती, नगर परिषदा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांच्या वतीने वृक्ष संवर्धनाचा संकल्प करण्यात आला.