आहे निवांत वेळ तरी ‘अमृताचा ठेवा’ नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 08:56 AM2020-03-30T08:56:59+5:302020-03-30T08:58:52+5:30

तू सर्वशक्तीमान असल्याचा आव आणतोस, मात्र एका अदृष्य विषाणूपुढे हतबल आहेस ही जाणिव हा कोरोना करवून देत आहे. एकांतवासात संपूर्ण जग गेले आहे. अशा काळात विचारकांनी दिलेला पुस्तकरूपी ‘ अमृताचा ठेवा’ वाचायची इच्छा असली तरी तो त्यांच्याकडे उपलब्ध नाही, या वेदना व्यक्त व्हायला लागल्या आहेत.

There is time but no books! | आहे निवांत वेळ तरी ‘अमृताचा ठेवा’ नाही!

आहे निवांत वेळ तरी ‘अमृताचा ठेवा’ नाही!

Next
ठळक मुद्देवाचनाची इच्छा असली तरी व्हाट्सअ‍ॅप शिवाय पर्याय नाहीकेवळ फॉरवर्डवर आहे भर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ज्या चिंतकांच्या, विचारवंतांच्या, भाष्यकारांच्या पुस्तकरूपी अनुभवांनी माणूस संपन्न झाला, त्याच पुस्तकांकडे तो दुर्लक्ष करू लागला. विचारकांच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करू लागला. कोरोनाचा महामार मानवाला त्याची जागा दाखवत आहे. तू सर्वशक्तीमान असल्याचा आव आणतोस, मात्र एका अदृष्य विषाणूपुढे हतबल आहेस ही जाणिव हा कोरोना करवून देत आहे. एकांतवासात संपूर्ण जग गेले आहे. अशा काळात विचारकांनी दिलेला पुस्तकरूपी ‘ अमृताचा ठेवा’ वाचायची इच्छा असली तरी तो त्यांच्याकडे उपलब्ध नाही, या वेदना व्यक्त व्हायला लागल्या आहेत.

निवांत वेळेते पुस्तकांशिवाय दुसरा सच्चा मित्र नाही. मात्र, हे मित्र आपाधापीच्या काळात मानव हरवून बसला आणि आता त्याची गरज असल्याने तोच मित्र उपलब्ध नसल्याची ओरड अनेकांकडून होत आहे. वाचनाची इच्छा असली तरी व्हाट्सअप, फेसबूक, इंटरनेटशिवाय त्याच्याकडे पर्याय नसल्याचे दिसून येते. पुस्तक वाचनाचा अनुभव अत्यंत आध्यात्मिक असतो. पुस्तकांची संगत वेगळ्या दुनियेत घेऊन जाणारी असते. मात्र, आता पर्याय नसल्याने व्हाट्अप, इंटरनेटवरच ती वाचावी लागत आहे. छोट्या स्क्रिनमुळे विचारशक्तीही छोटी झाली आणि सतत वेगवेगळे नोटीफिकेशन मिळत असल्याने, वाचनात खंड पडतो आहे. जे काही वाचले त्याचा आनंदही केवळ वाचण्यापुरताच मिळतो आणि इंटरनेट बंद झाले की तो आनंद मिटतो. तरी देखील फॉरवर्डचा महापूर सर्वत्र आला आहे. त्यातही कितीजण ते फॉरवर्ड पुस्तके वाचत आहेत, हा मोठ्ठा प्रश्न आहे.

सच्चिदानंद शेवडे, चारुदत्त आफळे झाले सक्रीय

: ज्यांना छोट्या स्क्रीनवर वाचने अवघड होत आहे, अशासाठी राष्ट्रीय प्रबोधनकार सच्चिदानंद शेवडे व राष्ट्रीय कीर्तनकार चारूदत्त आफळे यांच्यासारखे तज्ज्ञ अभ्यासक सक्रीय झाले आहेत. महापुरुषांचे चरित्र व प्रेरक कथा त्यांच्या शैलित फेसबूक व व्हॉट्सअपवर लाईव्ह किंवा व्हीडीओ अपलोड करून नागरिकांना सांगत आहेत. अनेक मोठे अभ्यासक सोशल डिस्टन्सिंगच्या काळात नागरिकांच्या रिकाम्या मेंदूला प्रेरित करण्याचे कार्य करत आहेत.

पीडीएफ फाईल्स होतोहेत व्हायरल

: प्रत्येकालाच वाचन संस्कृतीशी जोडणारा एक उपक्रम सुरू झाला आहे. यात वि. स. खांडेकर यांचे ययाती, वि. दा. सावरकर लिखित माझी जन्मठेप, शिवाजी सावंत लिखित युगंधर, रणजित देसाई लिखित पावनखिंड, छत्रपती संभाजी महाराज विरचित बुधभूषण व पु. ल. देशपांडे लिखित बटाट्याची चाळ अशा काही पुस्तकांच्या पीडीएफ व्हायराल होऊ लागल्या. सगळेच सगळ्यांना वाचण्याचे आवाहन करत आहेत.

येथेही वैचारिक भिन्नता

: व्हाट्सअपवर किंवा फेसबूकवरही पुस्तकांचे प्रसारण करताना वैचारिक भिन्नता दिसून येत आहे. उजव्या विचारकांनी आपल्या शैलीची पुस्तके व्हायरल करण्यास सुरुवात केल्याचे बघून डावे विचारकही सरसावले आहेत. तसेच फेसबूक लाईव्ह किंवा व्हिडीओ अपलोड केले जात आहेत.

अमृताचा ठेवा बाहेर काढा आणि वाचन करा - बापू चनाखेकर

: खरे तर ह्यमन डिस्टन्सिंग आपल्याकडे व्यस्ततेमुळे सुरूच आहे. कोरोनाने सोशल डिस्टन्सिंग अनुभवतो आहे. पुस्तके ही अमृताचा ठेवा आणि हा ठेवा घरात असेल तर तो बाहेर काढा आणि वाचन करा. कोरोनामुळे एकांतवास काय असतो, याचे महत्त्व अनेकांना कळले असेल. या एकांतवासाचा सदुपयोग करा. गाथा, कथा, अभंग, नाटक यांचे पारायण करा आणि पुढच्या पिढींना समृद्ध करा, असे आवाहन ज्येष्ठ रंगकर्मी बापूकाका उपाख्य अनिल चनाखेकर यांनी केले आहे.

 

 

 

Web Title: There is time but no books!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.