दाल में कुछ काला है?
By Admin | Updated: December 8, 2014 00:53 IST2014-12-08T00:53:05+5:302014-12-08T00:53:05+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा भवनात शनिवारी एकच खळबळ उडाली. एकाच वेळी कुलगुरू, प्र-कुलगुरू आणि कुलसचिव हे तिघेही वरिष्ठ अधिकारी सकाळच्या वेळेसच

दाल में कुछ काला है?
नागपूर विद्यापीठ : अधिकाऱ्यांकडून ‘स्पॉट’ मूल्यांकन केंद्राची आकस्मिक तपासणी
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा भवनात शनिवारी एकच खळबळ उडाली. एकाच वेळी कुलगुरू, प्र-कुलगुरू आणि कुलसचिव हे तिघेही वरिष्ठ अधिकारी सकाळच्या वेळेसच तिथे धडकले आणि परीक्षा भवनाची आकस्मिक तपासणी केली. यावेळी त्यांचा मुख्य रोख हा ‘स्पॉट’ मूल्यांकन केंद्राकडे होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ही तपासणी नेहमीच्याच कामाचा भाग असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरी, तिघाही अधिकाऱ्यांना एकाच वेळी परीक्षा भवनाकडे धाव घेण्यासारखे नेमके कारण तरी काय होते, यासंदर्भात निरनिराळ्या चर्चांना उधाण आले आहे.
नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा भवनासंदर्भात बरेचदा तक्रारी करण्यात येतात. यातील बऱ्याचशा तक्रारी या मूल्यांकनाशी संबधित असतात. ‘स्पॉट’ मूल्यांकन केंद्रावर काही गडबड असल्याची निनावी तक्रार नुकतीच विद्यापीठाला प्राप्त झाली होती. शिवाय प्राधिकरणांतील काही सदस्यांनी यासंदर्भात शंका उपस्थित केली होती.
हिवाळी परीक्षांची धामधूम तसेच मूल्यांकनाची घाईगर्दी सुरू असताना शनिवारी सकाळच्या सुमारास कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, प्र-कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर व कुलसचिव डॉ. अशोक गोमाशे हे तिघेही परीक्षा भवनात पोहोचले.
यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला व प्रत्येक जण नेटाने काम सुरू आहे, असे भासविण्याचा प्रयत्न करायला लागला. या तिघाही अधिकाऱ्यांनी ‘स्पॉट’ मूल्यांकन केंद्राची पाहणी केली व तेथील कर्मचाऱ्यांना विचारणा केली. ‘स्पॉट’ मूल्यांकन केंद्राशी संबंधित व रोजंदारीवर कार्यरत असलेले नेमके किती कर्मचारी कामावर आहेत, त्यांची तपासणी होते का आणि ‘स्पॉट’ मूल्यांकन केंद्र पूर्णत: सुरक्षित आहेत का इत्यादी बाबींची त्यांनी तपासणी केली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
यासंदर्भात एका वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारणा केली असता त्यांनी अशी तपासणी झाली असल्याचे मान्य केले.
परंतु तिघेही अधिकारी तातडीने नेमके कुठल्या कारणामुळे धडकले याचे कारण माहीत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यापीठाचे माध्यम समन्वयक डॉ. श्याम धोंड यांनी यासंदर्भात काहीच कल्पना नसल्याचे सांगितले. कुलगुरू, प्र-कुलगुरू व कुलसचिव यांच्यापैकी एकाही अधिकाऱ्याशी संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)