नाण्यांची ‘लिंक’ लागता लागेना
By Admin | Updated: April 8, 2016 02:56 IST2016-04-08T02:56:21+5:302016-04-08T02:56:21+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व विभागातून वाकाटककालीन नाणी गायब झाल्याच्या प्रकरणातील गूढ दिवसेंदिवस वाढत आहे.

नाण्यांची ‘लिंक’ लागता लागेना
नागपूर विद्यापीठ : माजी विभागप्रमुखांच्या स्पष्टीकरणावर कुलगुरू असमाधानी
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व विभागातून वाकाटककालीन नाणी गायब झाल्याच्या प्रकरणातील गूढ दिवसेंदिवस वाढत आहे. विभागाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीकडून विविध दावे करण्यात येत आहेत. माजी विभागप्रमुख डॉ. प्रदीप मेश्राम यांची कुलगुरूंनी चौकशी केली. परंतु त्यांच्या स्पष्टीकरणावर समाधानी नसल्याचे त्यांनी सांगितले. एकूणच नाणे प्रकरणामुळे आता खुद्द कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे हे देखील संभ्रमात पडले आहेत.
१९६७ साली पवनारजवळील शेतात सापडलेली दोनशेहून अधिक नाणी विभागात आता नसल्याची बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणली होती. याबाबतचा चौकशी अहवालदेखील गायब झाला असून या प्रकरणातील गूढ वाढले आहे. यानंतर विद्यापीठ प्रशासन चांगलेच हादरले आहे. डॉ. प्रदीप मेश्राम गेल्या सोमवारपासून विनापरवानगी तसेच कुणालाही न कळविता सुटीवर गेले होते. कुलगुरूंनी कडक पवित्रा घेतल्यावर डॉ. मेश्राम यांनी बुधवार व गुरुवार अशी दोन दिवस त्यांच्यासमोर हजेरी लावली. गुरुवारी कुलगुरूंनी डॉ. मेश्राम यांच्यासोबतच विभागातील ‘क्राफ्टमन’ सहारकर तसेच छायाचित्रकार वंदना खेडीकर यांनादेखील बोलविले व प्रत्येकाला विचारणा केली. माजी विभागप्रमुख डॉ. गुप्त यांनी याबाबत कुठलीही माहिती दिली नव्हती व ही नाणी मी कधीही हाताळली नाही, असा दावा डॉ. मेश्राम यांनी सुरुवातीला केला. परंतु त्यांचे या नाण्यांवरच संशोधन असल्याचे कुलगुरूंनी म्हणताच डॉ. मेश्राम अडखळले. डॉ. गुप्त यांनी २००४ साली तर डॉ. मेश्राम यांनी त्यानंतर काही वर्षांनी या नाण्यांची छायाचित्रे काढण्यास सांगितली होती. सहारकर यांच्या माध्यमातून ही नाणी माझ्याकडे पाठविली होती, असे खेडीकर यांनी सांगितले. याबाबतचे लेखी पुरावेदेखील आपल्याकडे असल्याचे त्यांनी कुलगुरूंना सांगितले. सहारकर यांनी ही नाणी आपल्या ‘कस्टडी’त कधीही नव्हते, असा दावा केला. त्यामुळे एकूणच नेमके कोण खरे बोलत आहे, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.(प्रतिनिधी)
अद्याप पोलीस तक्रार नाही
देशाची मौलिक संपत्ती असलेली नाणी गायब झाल्याचे प्रकरण गंभीर आहे. परंतु त्यावर अद्यापही विद्यापीठाने पोलीस तक्रार केलेली नाही. सर्व कागदपत्रे तसेच संबंधितांची लेखी उत्तरे आली की त्यावर विचार करू असे कुलगुरूंनी सांगितले. डॉ.प्रदीप मेश्राम या महिन्यात निवृत्त होणार आहेत. तेव्हा त्यांचे नाव या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी कुलगुरूंवर काही अधिकाऱ्यांचा दबाव असल्याची विद्यापीठ वर्तुळात चर्चा आहे. परंतु आपल्यावर कुणाचेही दडपण नाही. वेळ पडली तर कठोर कारवाई करू असे ते म्हणाले.
सुटीवर असताना कार्यभार कसा सोपविला?
तत्कालीन विभागप्रमुख डॉ.प्रदीप मेश्राम यांनी केवळ प्रशासकीय पदभार सोपविला होता, असा दावा आताच्या विभागप्रमुख डॉ.प्रीती त्रिवेदी यांनी केला होता. मुळात डॉ.मेश्राम हे डिसेंबर २०१३ मध्ये एक महिन्याच्या रजेवर गेले होते. रजेवर असतानादेखील १० डिसेंबर रोजी ते विभागात आले व कार्यभार सोपविला अशी नोंद आहे. जर डॉ.मेश्राम रजेवर होते तर कार्यभार कसा काय सोपविला याचे कुठलेही उत्तर त्यांच्याकडे नसल्याचे कुलगुरूंनी स्पष्ट केले.