शिक्षण विभागात खळबळ! विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना गडचिरोलीत अटक
By मंगेश व्यवहारे | Updated: April 12, 2025 12:23 IST2025-04-12T12:22:48+5:302025-04-12T12:23:10+5:30
पोलिसांची कारवाई; बोगस कागदपत्रांच्या आधारावर मुख्याध्यापक पदास मंजुरी दिल्याचे प्रकरण

शिक्षण विभागात खळबळ! विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना गडचिरोलीत अटक
मंगेश व्यवहारे, नागपूर: बोगस शालार्थ आयडी प्रकरणात वेतन पथक अधीक्षक नीलेश वाघमारे यांना निलंबित केल्यानंतर शुक्रवारी उशिरा रात्री नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना सदर पोलिसांनी गडचिरोलीतून अटक केली. त्यांच्यावर बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापक पदाची मंजुरी दिल्याचा आरोप आहे. त्यांना मध्यरात्री १२:३० नंतर नागपुरात आणण्यात आले. या प्रकरणात मुख्याध्यापक पराग नानाजी पुडके (रा. जेवताळा, ता. लाखनी, जि. भंडारा) यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुख्याध्यापक पराग नानाजी पुडके याला शिक्षक पदाचा अनुभव नसताना तसेच शिक्षक म्हणून कोठेही काम केले नसताना सरळ मुख्याध्यापक बनविण्यात आले. आरोपी मुख्याध्यापक पराग पुडके याने नागपूर येथील एस. के. बी. उच्च प्राथमिक, माध्यमिक विद्यामंदिर यादवनगर या शाळेची बोगस व बनावट कागदपत्रे तयार केली. त्या आधारावर उपसंचालक उल्हास नरड यांनी आर्थिक व्यवहार करून चुकीच्या पद्धतीने नानाजी पुडके विद्यालय (जेवताळा, तालुका लाखनी, जिल्हा भंडारा) येथे मुख्याध्यापक पदासाठी मंजुरी दिली.
या प्रकरणांमध्ये सदर पोलिसांनी उपसंचालक उल्हास नरड यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात जिल्हा परिषदेचा शिक्षण विभागातील अधिकारी, वेतन पथक अधीक्षक तसेच इतर अधिकारी यांचाही समावेश असल्याचे फिर्यादीच्या तक्रारीत नमूद आहे.