धान खरेदी केंद्रावर गोलमाल झाला का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:08 IST2021-06-02T04:08:38+5:302021-06-02T04:08:38+5:30
रामटेक : तालुक्यात ३१ मार्चपासून धान विक्री केंद्र बंद करण्यात आली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा धान घरीच किंवा केंद्रावर पडून ...

धान खरेदी केंद्रावर गोलमाल झाला का?
रामटेक : तालुक्यात ३१ मार्चपासून धान विक्री केंद्र बंद करण्यात आली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा धान घरीच किंवा केंद्रावर पडून आहे. तेव्हा शासनाने धान खरेदी केंद्र सुरू करावे व धान खरेदी झालेल्या शेतकऱ्यांचे धानाचे चुकारेही त्वरित जमा करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. रामटेक तालुक्यात धान खरेदी शासकीय दराने खरेदी-विक्री संघ व आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांकडून विविध धान केंद्रांवर केली गेली. पण धान खरेदी पूर्ण व्हायच्या अगोदरच ती बंद करण्यात आली. रामटेक तालुक्यात सर्व केंद्रांवर एकूण ६१६० शेतकऱ्यांनी सातबारा जमा केले. ऑनलाइन नोंदणी झालेले सातबारा ४८८५ इतके आहेत. धानाचे मोजमाप झालेले शेतकरी २,७०७ असून, त्यांच्याकडून १,०९,५७८.०० क्लिंटल धान खरेदी करण्यात आला. रामटेक तालुक्यात मागील खरीप हंगामात २०,७५० हेक्टरवर पारशिवनी तालुक्यात ९५१६ हेक्टर, तर ३७ हजार हेक्टरवर मौदा तालुक्यात धान क्षेत्र होते. रामटेक तालुक्यात सहा हजार हेक्टरवर सिंचनाखाली धान पिकावला जातो. पण धान केंद्रावर जो धान खरेदी केला गेला तो शेतकऱ्यांचा नसून व्यापाऱ्यांचा आहे. शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर ही खरेदी केली गेली असा आरोप करण्यात येत आहे. गतवर्षी बारीक धान अवकाळी पावसाने लोटला असे अहवालात नमूद आहे. पण या शेतकऱ्यांच्या नावाने धान खरेदी केंद्रावर ठोकळ धान टाकला आहे. २०२१-२२ खरीप हंगाम सुरू झाला आहे. पण मागील खरीप हंगामातील धान पडून आहे. पण व्यापाऱ्यांनी व दलालांनी इतर राज्यातील धान मात्र शासकीय केंद्रावर विक्री केला आहे. यात नियमाप्रमाणे नोंदणी केलेले शेतकरी मात्र ताटकळत ठेवले. कृषी विद्यापीठाने या धानाची तपासणी केली तर हा धान बाहेरचा आहे हे कळून येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकविलेल्या धानापेक्षा खरेदी केलेला धान जास्त कसा हा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उदयसिंग यादव यांनी मुख्यमंत्री व पालकमंत्री यांना निवेदन देत धान खरेदी केंद्र सुरू करावे, धान खरेदी झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित चुकारे द्यावे यासोबतच खरेदी केंद्रावर झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
---------------------------
रामटेकमध्ये केवळ एक पाॅझिटिव्ह
रामटेक तालुक्यातील ग्रामीण भागात एका रुग्णाची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत ६५२० रुग्णांची नोंद झाली आहे. यातील ६,३११ कोरोनामुक्त झाले. १२३ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २०९ इतकी आहे.